21 नोव्हेंबर रोजी देखील राज्यात वातावरणात गारवा कायम असणार आहे. उत्तर भारतातून येणारा वाऱ्यांचा प्रवाह राज्यात हुडहुडी वाढवतोय. त्यामुळे पुढील दोन दिवसांत राज्यातील तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील पुणे, नाशिक, जळगाव या प्रमुख शहरात गेले काही दिवस एक अंकी तापमान नोंदवले गेले होते. आता त्यात 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. तरी तापमान साधारणपणे ९ ते ११ अंशांच्या दरम्यान असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अलर्ट जारी

राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार, 21 नोव्हेंबर रोजी राज्यात तापमानात घट कायम राहणार असून बहुतांश भागांत कोरडे आणि निरभ्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडे थंडी वाढत असून पारा सातत्याने घसरत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह येत असल्याने गारठा कामय आहे. शिवाय सकाळी गार वाऱ्यासह गारठा जाणवतोय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका अजून वाढेल. महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यातील इतर शहरांत तापमानात घट होत आहे. पण, मुंबईत मात्र अजूनही तापमानात पाहिजे तशी घट झालेली नाही. 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत किमान तापमान 22 तर कमाल तापमान 34 अंश सेल्सियस एवढं राहील. राज्यातील पुणे, नाशिक, जळगाव या प्रमुख शहरात गेले काही दिवस एक अंकी तापमान नोंदवले गेले होते. आता त्यात 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.

पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका

पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कायम आहे. पुण्यात 20 नोव्हेंबर रोजी 11 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं. तर 21 नोव्हेंबर रोजी पुण्यात 12 अंश सेल्सियस एवढं किमान तापमान पहायला मिळेल. पुण्यातील तापमानात 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये 20 अंश सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे. तापमानात सर्वाधिक घट ही उत्तर महाराष्ट्रात बघायला मिळाली.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 12 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. 21 तारखेला 13 अंश तापमान राहील. उत्तर महाराष्ट्रातील तापमानातही 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जळगावमध्येही पारा घसरलेलाच पहायला मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मराठवाड्यातील तापमानात देखील 2 अंशांनी वाढ झाली आहे. तरीही वातावरणात गारवा कायम राहण्याची शक्यता आहे.

विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानात किंचित वाढ दिसून येत आहे. सकाळी आणि सायंकाळी गारवा तसेच काही भागांत दुपारी उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागू शकतात.

भयंकर थंडीत आरोग्याची काळजी घ्या !

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.

थंड हवेत अचानक बाहेर जाणे टाळावे आणि गरम कपड्यांचा योग्य वापर करावा. हलका व्यायाम नियमितपणे करावा, परंतु अत्यंत थंडीत जड व्यायाम टाळावा. आहारात गरम, हलके आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. भरपूर पाणी पिऊन शरीरातील ओलावा टिकवणेही महत्त्वाचे आहे. धूम्रपान, मद्यपान यांसारख्या सवयी थंडीत अधिक धोकादायक ठरतात, त्यामुळे त्यापासून दूर राहणे उत्तम. थंडीच्या दिवसांत छातीतील वेदना, श्वास घेण्यात अडचण, थकवा किंवा अस्वस्थता जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.