कन्फर्म तिकिटांच्या बाबतीत भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांना कसा फायदा होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
लवकरच रेल्वे प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटाची तारीख विनाशुल्क बदलण्याची सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
कन्फर्म तिकिटांच्या बाबतीत भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांना कसा फायदा होणार?

भारतीय रेल्वे ही देशाच्या वाहतूक व्यवस्थेची जीवनरेखा मानली जाते. ती दररोज कोट्यवधी प्रवाशांना सुरक्षित, स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा पुरवते. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारे हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. रेल्वेमुळे लोकांना रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होतात. ती देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देते कारण मालवाहतुकीतही रेल्वेची भूमिका महत्त्वाची आहे. प्रवाशांसाठी रेल्वे ही केवळ प्रवासाची साधन नसून, ती संस्कृती, एकता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने अनेक निर्णय घेतले जात असतात. तसाच आणखी एक महत्वपूर्ण निर्णय रेल्वेकडून नुकताच घेण्यात आला आहे.

कन्फर्म तिकिटाची तारीख विनाशुल्क बदला!

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. कायम गर्दी, वेटिंग लिस्ट आणि सणासुदीच्या काळात तिकीट मिळविण्याच्या समस्या पाहता हा बदल प्रवाशांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. लवकरच रेल्वे प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकिटाची तारीख विनाशुल्क बदलण्याची सुविधा मिळणार आहे. याआधी प्रवासाची तारीख बदलावी लागल्यास प्रवाशांना तिकीट रद्द करून नवीन तिकीट घ्यावे लागत होते. या प्रक्रियेत केवळ वेळ आणि पैसा नाही, तर मानसिक त्रासही वाढायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर प्रवासी आपल्या कन्फर्म तिकिटावर प्रवासाची तारीख थेट ऑनलाइन बदलू शकतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या बदलासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. यामुळे प्रवाशांना अनावश्यक आर्थिक नुकसान वाचणार आहे. या निर्णयाचे सध्या सर्व स्तरांतून स्वागत होताना दिसत आहे.

सणासुदीच्या काळात रेल्वेचा प्रवाशांना दिलासा

दररोज कोट्यवधी प्रवाशांच्या प्रवासाशी निगडित असलेल्या भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग प्रणालीत हा मोठा बदल आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय आणखी महत्त्वाचा ठरतो. रेल्वे विभागाकडून लवकरच हा निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती मिळत असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन निर्णयामुळे प्रवासी तिकीट रद्द न करता त्यांच्या तारखा बदलू शकतील ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.