Tue, Dec 30, 2025

लाडक्या बहिणींना e-KYC साठी मुदतवाढ नाहीच? आदिती तटकरेंचे महत्वाचे आवाहन

Written by:Rohit Shinde
Published:
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची डेडलाईन आता जवळ आली आहे. अद्याप 40 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यासंदर्भात मंत्री आदिती तटकरेंनी महिलांना एक महत्वाचे आवाहन केले आहे.
लाडक्या बहिणींना e-KYC साठी मुदतवाढ नाहीच? आदिती तटकरेंचे महत्वाचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. कारण ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरची अंतिम मुदत आहे. अशा परिस्थितीत लाखो महिलांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही. त्यामुळे अशा महिलांना आता मंत्री आदिती तटकरेंनी देखील एक महत्वाचे आवाहन केले आहे.  ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे या तारखेनंतर पुढे काय होणार? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहेत. याच दरम्यान मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी एक खास पोस्ट केली आहे.

आदिती तटकरेंचे महिलांना महत्वाचे आवाहन

मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी खास पोस्ट केली आहे. सोशल मीडियातील एक्स हँण्डलवर पोस्ट करत मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं, लाडक्या बहिणींनो… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे काही दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती ! अशा स्वरूपाचे आवाहन मंत्री आदिती तटकरेंनी महिलांना केले आहे. सद्यस्थितीला महिलांच्या हातामध्ये अवघे तीन दिवस उरले आहेत.

40 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार ?

या योजनेचा सध्या राज्यातील 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ मिळत आहे. मात्र, त्यापैकी केवळ सुमारे 1 कोटी 60 लाखांच्या आसपास महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेचा धोका निर्माण झाला आहे. यात ग्रामीण व शहरी भागातील अनेक लाभार्थी महिलांचा समावेश आहे. राज्य सरकारने ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर अपूर्ण ई-केवायसी असलेल्या लाभार्थ्यांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खरंतर महायुती सरकारसाठी महत्त्वाची आणि निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. या योजनेतील 40 लाखांहून अधिक महिला लाभार्थ्यांवर अपात्र ठरण्याची टांगती तलवार आहे. कारण मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पात्रतेची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली असून, मुदत संपल्यानंतर अपूर्ण प्रकरणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

e-KYC / दुरूस्तीसाठी 31 डिसेंबरची मुदत

ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र, ई-केवायसी करताना काहींनी चुकीची माहिती भरल्याने त्यात दुरुस्तीची आवश्यकता आहे. तुम्हाला सुद्धा केवायसीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर काळजी करू नका. कारण, तुम्हाला केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची एक शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.

मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे असंही मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!

योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.

  • लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
  • संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
  • तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.

यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.