Marathi News

HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा; 30 नोव्हेंबरची मुदतवाढ, तात्काळ नंबर प्लेट बनवून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
वाहन मालकांकडून प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे सरकारने अखेर आता मुदत वाढवली आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आली आहे.
HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा; 30 नोव्हेंबरची मुदतवाढ, तात्काळ नंबर प्लेट बनवून घ्या!

राज्य शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या वाहनमालकांनी यापूर्वी HSRP साठी नोंदणी केली नाही, त्यांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी. 1 डिसेंबर 2025 नंतर HSRP नसलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

30 नोव्हेंबरची मुदतवाढ मिळाल्याने दिलासा

ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत आहेत, त्यांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 होती. पण वाहन मालकांकडून प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे सरकारने अखेर आता मुदत वाढवली आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे चालकांना अथवा वाहन मालकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी आणखी मुदत मिळणार आहे. भविष्यातील दंडात्मक अथवा होणारी कायदेशी कारवाई टाळायची असेल तर तुम्ही देखील या नंबर प्लेट तात्काळ बसवून घ्या…

HSRP नंबर प्लेटचे महत्व नेमके काय?

HSRP (High Security Registration Plate) ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली नंबर प्लेट आहे, जी भारत सरकारने अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सक्तीने लागू करण्यात आली आहे. HSRP प्लेटमध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, एक कोड, आणि स्थायिक क्लॅम्प्स असतात, जे नकली नंबर प्लेट्सपासून संरक्षण देतात. यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सुलभ होते. पोलिस आणि परिवहन विभागासाठी वाहन ओळखणे सोपे जाते. RTO कार्यालयातून अधिकृत वितरकांकडूनच ही प्लेट मिळते. HSRP लागू केल्याने महाराष्ट्रातील वाहनांचे नोंदणी आणि ट्रॅकिंग अधिक पारदर्शक व सुरक्षित झाले आहे. त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची ठरते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews