नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला डिलिव्हरी कामगारांच्या संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मनी आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना दिल्या जाणाऱ्या मानधनात (पे-आउट) वाढ केली आहे. सणासुदीच्या काळात मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांकडून केली जाणारी ही एक मानक प्रक्रिया आहे.
नववर्षाचा सेलिब्रेशन प्लॅन फसणार, कारण काय ?
नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्डची डिलेव्हरी सर्व्हिस बंद राहणार आहे. नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येलाच या देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात या संपाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. जे नागरिक कोणतीही ऑनलाईन वस्तू किंवा जेवण ऑर्डर करणार असाल तर तुम्हाला ऑनलाईन डिलेव्हरीसाठी अडचण येण्याची शक्यता आहे. या बंदचा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, नागपूरसह देशभरातली अनेक प्रमुख शहरांना या बंदचा मोठा फटका बसणार आहे.
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ट ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. मुख्य ऑनलाईन डिलेव्हरी ॲपसोबतच महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील काही प्रादेशिक संघटनांनीही या संपामध्ये आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्या संघटनांकडूनही ग्राहकांना सर्व्हिस दिली जाणार आहे. देशातील तब्बल एक लाखांहून अधिक डिलेव्हरी बॉय आज त्यांच्या ॲपचं लॉग ईन करणार नसून काही मर्यादित काळासाठीच ग्राहकांना सर्व्हिस पुरवणार आहेत.
झोमॅटो – स्विगीची डिलिव्हरी पार्टनर्ससाठी ऑफर
झोमॅटोने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी ६ ते रात्री १२ या पीक अवर्समध्ये प्रति ऑर्डर १२० ते १५० रुपये देण्याची ऑफर दिली आहे. ऑर्डर्सची संख्या आणि कामगारांच्या उपलब्धतेनुसार, डिलिव्हरी पार्टनर्स एका दिवसात ३,००० रुपयांपर्यंत कमाई करू शकतील, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय, झोमॅटोने ऑर्डर नाकारणे किंवा रद्द करणे यावरील दंडही तात्पुरता रद्द केला आहे. स्विगीने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांत डिलिव्हरी कामगारांना १०,००० रुपयांपर्यंत कमाई करण्याची संधी दिली आहे. फक्त ३१ डिसेंबरच्या रात्री (संध्याकाळी ६ ते १२) सहा तासांच्या कालावधीत २,००० रुपयांपर्यंत कमाई करण्याचे आश्वासन कंपनीकडून दिले जात आहे.
कामगार संघटनांचा संप नेमका कशासाठी?
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन (TGPWU) आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (IFAT) यांनी या संपाची हाक दिली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
उत्पन्नातील घट: डिलिव्हरीसाठी मिळणाऱ्या मानधनात झालेली कपात मागे घ्यावी.
कामाची सुरक्षितता: डिलिव्हरीच्या वाढत्या दबावामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
सन्मानाची वागणूक: कामाच्या ठिकाणी सन्मान आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात.
संघटनांच्या दाव्यानुसार, देशभरातील सुमारे १.७ लाख कामगारांनी या संपात सहभागी होण्याचे निश्चित केले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. २५ डिसेंबर रोजी झालेल्या संपानंतरही कंपन्यांनी कोणताही संवाद न साधल्याने ३१ डिसेंबर २०२५ रोजी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.





