राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठा जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यभरातील तापमानात कमालीची घसरण झाल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवू लागली असून राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे. आज 26 डिसेंबर रोजी देखील राज्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्यभरात थंडीची काय स्थिती ?
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे अनेक भागांत गारठा जाणवत असून हिवाळ्याचे वातावरण अधिक ठळक झाले आहे. 26 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील विविध भागांत थंडीचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, नाशिकसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढलेली दिसून येत आहे. विशेषतः अंतर्गत भागांत किमान तापमान लक्षणीयरीत्या खाली घसरले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील नागरिकांवर होत असून शहरी भागातील नागरिकांसह ग्रामीण भागातील शेतकरी वर्गालाही थंडीचा सामना करावा लागत आहे.
आजचे हवामान कसे असेल ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात 26 डिसेंबर रोजी हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे. आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहील. मुंबईत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसदरम्यान, तर किमान तापमान 18 ते 20 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत किमान तापमानात 1 ते 2 अंशांची घट नोंदवली गेली असून सकाळी आणि रात्री गारवा अधिक जाणवणार आहे. काही भागांत सकाळच्या वेळेत हलके धुके पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील अंतर्गत भागांत थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात किमान तापमान 10 ते 14 अंशांदरम्यान राहील, तर विदर्भातील काही भागांत ते 8 ते 12 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूरसह आसपासच्या भागांत सकाळी गारवा अधिक जाणवेल. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र राहणार आहे. पुण्यात किमान तापमान 10 ते 12 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 28 ते 30 अंशांपर्यंत जाऊ शकते. ग्रामीण भागात गारठा अधिक जाणवणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.





