महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. महापालिका निवडणुकीत 2017 साली कोणत्या पक्षाचे शहरांनुसार किती संख्याबळ होते, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम थोडक्यात
मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल काही दिवसांपूर्वी वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 25 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवार माघारीची मुदत – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवाराची यादी – ३ जानेवारी २०२६
मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
मतमोजणी तारीख – १६ जानेवारी २०२६
2017 साली कोणत्या पक्षाचे किती संख्याबळ ?
महाराष्ट्रातील मागील महापालिका निवडणुकांकडे पाहिलं, तर 2015 ते 2018 या कालावधीत राज्यात एकूण 27 महापालिका होत्या. त्या वेळी 1268 वॉर्डांमध्ये तब्बल 17 हजार 438 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकांमधून एकूण 2 हजार 736 नगरसेवक निवडून आले.
मागील निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत राज्यातील शहरी राजकारणात आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. तब्बल 1 हजार 99 नगरसेवक निवडून आणत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपपाठोपाठ त्या काळात एकसंघ असलेल्या शिवसेनेने 489 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेससाठी मात्र ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली होती. तरीही काँग्रेसने 439 नगरसेवक निवडून आणत आपली उपस्थिती टिकवून ठेवली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 294 जागांवर विजय मिळवत चौथं स्थान पटकावलं होतं.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षेपेक्षा मर्यादित यश मिळालं होतं. मनसेचे केवळ 26 नगरसेवक निवडून आले होते. तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे 38 नगरसेवक विजयी झाले होते. याशिवाय शेतकरी कामगार पक्ष, बहुविकास आघाडी आणि इतर नोंदणीकृत पक्षांचे मिळून 154 नगरसेवक निवडून आले होते, तर 89 अपक्षांनीही महापालिकांमध्ये प्रवेश केला होता.
प्रमुख पक्षांची महापालिकानिहाय कामगिरी पाहिली, तर शिवसेनेने मुंबई महापालिकेत तब्बल 84 जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती. ठाण्यात 67 आणि कल्याण-डोंबिवलीत 52 जागा जिंकत शिवसेनेने पन्नाशीचा टप्पा पार केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबईत 52 जागा मिळवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. तर पक्षाचा गृहजिल्हा असलेल्या पुण्यात 39 जागा, पिंपरी-चिंचवडमध्ये 36 आणि ठाण्यात 34 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला होता.
मनसेची कामगिरी काही ठराविक शहरांपुरती मर्यादित राहिली होती. मुंबईत 7, कल्याण-डोंबिवलीत 9, नाशिकमध्ये 5, पुण्यात 2, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 आणि चंद्रपूरमध्ये मनसेचे 2 नगरसेवक निवडून आले होते.
आता राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जुने आकडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पक्षफुटी, नव्या आघाड्या, बदललेली राजकीय समीकरणं आणि शहरी मतदारांचे बदलते प्राधान्यक्रम पाहता यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हं आहेत. कोणता पक्ष आपली ताकद टिकवून ठेवतो, कोणाला धक्का बसतो आणि कोण बाजी मारतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.






