महाराष्ट्रात सध्या मुंबई, पुण्याच्या पाठोपाठ सोलापूर विमानतळ चांगलेच नावारूपाला येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता नागपूर विमानतळावरील सेवा मात्र चांगलीच विस्कळीत झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र सध्या प्रचंड अशी संतापाची लाट सध्या पाहायला मिळत आहे. नागपूर विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
नागपूर विमानतळावरील सेवा विस्कळीत
स्टार एअरने नागपूरहून नांदेड, बेळगाव, पुणे आणि बेंगळुरूला जाणारी उड्डाणे बंद केली आहेत. किशनगडला जाणारी उड्डाणेही अनियमित आहेत. प्रवाशांनी तक्रार केली आहे की कंपनी शेवटच्या क्षणी उड्डाणे रद्द करत आहे. बेळगाव, किशनगड, पुणे आणि बेंगळुरूनंतर नांदेडला उड्डाणे सुरू करण्याची स्टार एअर एअरलाइन्सची घोषणा प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देणारी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देणारी दिसत होती, परंतु कंपनीने नागपूरहून अनेक शहरांची आपली सेवा बंद केली, त्यामुळे सध्या प्रवाशांमध्ये मात्र चांगलीच संतापाची लाट पाहायला मिळत आहे.
किशनगडला जाणाऱ्या विमानांचे वेळापत्रकही सतत बदलत असते, ज्यामुळे प्रवाशांचा कंपनीवरील विश्वास उडाला आहे. प्रवाशांच्या मते, शेवटच्या क्षणी विमान उड्डाणे रद्द केली जातात, ज्यामुळे मोठी गैरसोय होते. गेल्या वर्षी जूनमध्ये जेव्हा कंपनीने नांदेडला उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली तेव्हा शीख लोक विशेषतः खूश झाले होते, परंतु अद्याप उड्डाणे सुरू झालेली नाहीत. यावरून असे सूचित होते की कंपनी फक्त हवाई घोषणा करते.
सोलापूर विमानतळ नावारूपाला आले!
उपराजधानीतील सेवा बिघडत असताना सोलापूर विमानतळ मात्र चांगलेच नावारुपाला येताना दिसत आहे. नव्याने साकारलेले सोलापूर विमानतळ आता नावारूपाला येत आहे. आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेले हे विमानतळ सोलापूर आणि आसपासच्या भागासाठी विकासाचे नवे दालन उघडणार आहे. प्रवाशांसाठी आरामदायी प्रतीक्षागृहे, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, तसेच विस्तृत धावपट्टी यामुळे या विमानतळाची गुणवत्ता वाढली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहकार्याने हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात आले असून आता देशांतर्गत उड्डाणांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. या विमानतळामुळे उद्योग, पर्यटन आणि व्यापारी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. सोलापूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरत आहे आणि शहर नव्या उंचीवर झेप घेण्यास सज्ज आहे.





