MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

30 नोव्हेंबरच्या आधी HSRP नंबर प्लेट बसवून घ्या; मुदतवाढ नाही, बसणार हजारोंचा दंड

Written by:Rohit Shinde
तुम्ही अद्यापही तुमच्या गाडीवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविली नसेल, तर 30 नोव्हेंबरनंतर तुमच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत. कारण तुम्हाला हजारो रूपयांच्या दंडाचा सामना करावा लागू शकतो.
30 नोव्हेंबरच्या आधी HSRP नंबर प्लेट बसवून घ्या; मुदतवाढ नाही, बसणार हजारोंचा दंड

केंद्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक केलं आहे. या नियमासाठी आतापर्यंत तीनदा मुदत वाढवण्यात आली होती. एप्रिल, जून आणि ऑगस्टनंतर आता अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. तरीदेखील मुंबईसह राज्यभरात लाखो वाहनमालकांनी अद्याप ही नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे सरकारकडून पुन्हा मुदतवाढ मिळणार का, याबाबत उत्सुकता वाढली असली तरी परिवहन विभागाने आतापर्यंत कोणताही नवीन निर्णय घेतलेला नाही.

पुन्हा मुदतवाढ मिळणार की नाही?

तुमचं वाहन 2019 पूर्वीचं असेल आणि अद्याप त्यावर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावलेली नसेल, तर आता लक्ष द्या. सरकारने या प्लेट बसवण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख जाहीर केली आहे. या मुदतीनंतर नियमाचे पालन न केल्यास वाहनमालकांना 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. शिवाय यामध्ये आता ही प्रक्रीया पार करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता एकदम धुसर झाली आहे. शिवाय, अद्याप परिवहन आरटीओकडून अशी कोणती घोषणा देखील करण्यात आलेली नाही.

…अन्यथा भरावा लागेल मोठा दंड

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले की, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित आहे. या तारखेनंतर नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. यामध्ये HSRP साठी अर्ज केलेला असेल पण प्लेट बसवलेली नसेल तर ₹1,000 दंड होईल. HSRP साठी अर्जही केलेला नसेल आणि प्लेट बसवलेली नसेल तर ₹10,000 दंड भरावा लागणार आहे.

HSRP नंबर प्लेटचे महत्व

HSRP (High Security Registration Plate) ही वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली नंबर प्लेट आहे, जी भारत सरकारने अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सक्तीने लागू करण्यात आली आहे. HSRP प्लेटमध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, एक कोड, आणि स्थायिक क्लॅम्प्स असतात, जे नकली नंबर प्लेट्सपासून संरक्षण देतात. यामुळे वाहन चोरी रोखण्यास मदत होते आणि ट्रॅफिक व्यवस्थापन सुलभ होते. पोलिस आणि परिवहन विभागासाठी वाहन ओळखणे सोपे जाते. RTO कार्यालयातून अधिकृत वितरकांकडूनच ही प्लेट मिळते. HSRP लागू केल्याने महाराष्ट्रातील वाहनांचे नोंदणी आणि ट्रॅकिंग अधिक पारदर्शक व सुरक्षित झाले आहे. त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची ठरते.