Marathi News

राज्यातील बहुतांश भागाला पावसाचा दणका; ठिकठिकाणी पुरस्थिती आणि शेतीचं नुकसान

Written by:Rohit Shinde
Published:
मान्सूनच्या पहिल्याच पावसानं महाराष्ट्राला चांगलाच दणका दिला. मध्य- पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले.
राज्यातील बहुतांश भागाला पावसाचा दणका; ठिकठिकाणी पुरस्थिती आणि शेतीचं नुकसान

पावसाने महाराष्ट्राला चांगलाच दणका दिला आहे. बारामती, दौंड, इंदापूर, भिगवण या परिसरात पूरस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी परिसरात जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्ये पावसाची संततधार आहे. मराठवाड्यात बीडमध्ये आणि परिसरात तुफान पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून राज्यातील बागायती क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं होतं,  मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झाला. विशेषतः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडला तळ्याचं स्वरुप प्राप्त झाल्याचं चित्र होतं. हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. भिगवण बस स्थानकात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता काहीशी सुधारणा होत आहे.

दुष्काळ माण-खटावला तुफान पाऊस

सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव हे दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. परंतु या भागात पावसाचं धुमशान काल दिवसभरात पाहायला मिळालं. सांगली – बारामती या राज्य महामार्गावर पाणी आल्याने दहिवडी नजीक हा रस्ता बंद होता. रात्री उशिरा या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे माणगंगा, येरळा या नद्यांना पूर आला असून तालुक्यातील बहुतांश छोटे मोठे तलाव भरले आहे. बऱ्याच ठिकाणी पावसामुळे बत्ती गुल झाली आहे.

मुंबई, ठाण्यात जनजीवन कोलमडले

आज झालेल्या पावसाने मुंबई ठाण्यासह राज्यात जोरदार हजेरी लावली. मुंबईतील वडाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. आज झालेल्या पावसाने रेल्वेची गती मंदावली असून तिची चाल काहीशी हळूहळू सुरू आहे. सर्व मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना ऑफिस गाठण्यासाठी काहीशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

बागायती क्षेत्राला फटका

आंबा, द्राक्ष आणि केळी उत्पादकांना या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. नागपूर भागात संत्र्याचा बहर येण्याचा काळ असल्याने या भागात देखील मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews