दररोज हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी सुखद बातमी आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची तांत्रिक चाचणी पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे. आयटी हब हिंजवडी आणि मुख्य शहराला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पुणे मेट्रो लाईन ३’ (माण-हिंजवडी ते शिवाजीनगर) बाबत एक अत्यंत मोठी आणि सकारात्मक अपडेट समोर आली आहे. या मार्गावरील मेट्रो सेवेसाठी अनिवार्य असलेली ‘आरडीएसओ’ची तांत्रिक तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, आता प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधीपासून धावणार ?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता मार्च २०२६ पर्यंत या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान प्रवाशांसाठी मेट्रो धावण्याची दाट शक्यता आहे. कोणताही रेल्वे किंवा मेट्रो प्रकल्प सुरू करण्यापूर्वी ‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ कडून हिरवा कंदील मिळणे बंधनकारक असते. या चाचणीत काही गोष्टींची कठोर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने हाय-स्पीडमध्ये मेट्रोची स्थिरता आणि आपत्कालीन ब्रेक यंत्रणा, डब्यांची रचना आणि रुळांची तांत्रिक सुसंगतता, मेट्रो मार्गावरील विद्युत यंत्रणेची कार्यक्षमता या बाबींचा समावेश होता.






