Marathi News

आज जेजुरी खंडोबा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत !

Written by:Rohit Shinde
Published:
खंडेरायाची सोन्याची जेजुरी अशी ओळख असणाऱ्या जेजुरीत आज मोठे भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. नववर्षाचे स्वागत भंडाऱ्याची उधळण करत करण्यात आले. यावेळी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
आज जेजुरी खंडोबा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत !

जेजुरीचे खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. खंडोबा महाराजांवर अपार श्रद्धा असलेल्या लाखो भाविकांची येथे दररोज दर्शनासाठी गर्दी होत असते. विशेषतः रविवारी, यात्रांच्या काळात तसेच सण-उत्सवांच्या वेळी मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो. पिवळ्या भंडाऱ्याची उधळण, घोषणांनी दुमदुमणारे डोंगर आणि भक्तीमय वातावरण हे जेजुरीचे वैशिष्ट्य आहे. अशा परिस्थितीतमध्ये आज 01 जानेवारी 2026 रोजी नववर्षाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे आज खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भंडाऱ्याची उधळण करत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत !

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक भाविक देवदर्शनाला प्राधान्य देतात. यानुसार, 1 जानेवारी रोजी जेजुरी गडावर श्री खंडोबा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी आणि भक्तिमय वातावरणात व्हावी, या हेतूने महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांवर भाविकांनी हजेरी लावली. त्यात जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे प्रमुख केंद्र ठरले. जेजुरी गडावर उपस्थित भाविकांनी मोठ्या उत्साहात खंडोबाचे दर्शन घेतले.  भंडारा उधळत नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा उत्साह त्यांच्यात दिसून आला. खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी लक्षणीय होती. वर्षाचा पहिला दिवस देवाच्या चरणी घालवून एक सकारात्मक सुरुवात करण्याची अनेकांची इच्छा होती. महाराष्ट्राच्या संस्कृतीत देवदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस भाविकांसाठी खास ठरला.

जेजुरीच्या खंडोबावर भक्तांची श्रध्दा

जेजुरीचे खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील भक्ती आणि श्रद्धेचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. खंडोबा महाराज हे लोकदैवत म्हणून ओळखले जात असून शेतकरी, कष्टकरी, वारकरी तसेच सर्वसामान्य जनतेचे ते आराध्य दैवत आहेत. जेजुरीच्या गडावर वसलेले हे प्राचीन मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे. वर्षभर हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात, मात्र मंगळवार, रविवार, चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या आणि यात्रेच्या काळात भक्तांची गर्दी प्रचंड वाढते. खंडोबा महाराजांना पिवळा भंडारा अर्पण करण्याची परंपरा असून संपूर्ण परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघतो. नवस, मनोकामना, आरोग्य, यश आणि सुख-समृद्धीसाठी भक्त श्रद्धेने दर्शन घेतात. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात वातावरण भक्तीमय होते. खंडोबा महाराजांवरील ही अढळ श्रद्धा पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली असून आजही ती तितकीच दृढ आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews