दहावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख समोर

Written by:Rohit Shinde
Published:
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे शुल्क आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख उद्यापासून सुरू होणार आहे. नियमित शुल्क भरून १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहे.
दहावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख समोर

दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जाते. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीचा मार्ग ठरतो. दहावीनंतर कोणत्या शाखेत किंवा क्षेत्रात जावे हे निश्चित करण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची ठरते. मेहनत, शिस्त आणि अभ्यासाचे नियोजन या गुणांचा पाया दहावीच्या अभ्यासक्रमातून मजबूत होतो. अशा या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी उद्यापासून अर्ज भरा!

दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, त्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे लक्ष या प्रक्रियेकडे लागलेले असते. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे शुल्क आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख उद्यापासून सुरू होणार आहे. नियमित शुल्क भरून १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहे. दहावी परीक्षेचे अर्ज हे केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांमार्फतच हे अर्ज भरावे, असं मत मंडळाने स्पष्ट केले आहे.

दहावीच्या परीक्षेचा अर्ज कसा भरता येणार?

विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया ‘यूडायस प्लस’ मधील पेनआयडी वरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत केली जाणार आहे. पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्यांचे अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) उपलब्ध होतील. हे अर्जही शाळाप्रमुखांमार्फत भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आरटीजीएस/ एनईएफटी याद्वारे भरावे लागणार आहे. त्याची पावती, चलन आणि विद्यार्थ्यांची यादी निर्धारित तारखेला सादर करावी लागेल.

दहावीच्या परीक्षा काळात अथवा शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या क्षमतांचा विकास होतो. समाजात दहावीचे स्थान एक प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांसाठीही ही परीक्षा विशेष असते. योग्य तयारी आणि चिकाटीने दहावी उत्तीर्ण होणे हे उज्ज्वल भविष्याचे दार उघडते.