मोफत अन्नधान्य ही भारतातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी महत्वाची योजना आहे. काही कार्ड धारकांना कमी पैशांत देखील रेशन पुरवठा होत असतो. अशा परिस्थितीत शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. या संदर्भात सरकार आणि शिधावाटप विभागाकडून वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही शिधापत्रिकाधारकांनी आपले ई-केवायसी केलेले नाहीये. तुम्ही सुद्धा ई-केवायसी केले नसेल तर तात्काळ करा अन्यथा बोगस रेशनकार्डच्या यादीत तुमच्या नावाचा समावेश होऊ शकतो.
गैरप्रकार टाळण्यासाठी e-KYC प्रक्रिया
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दिले जाणारे रेशन केवळ पात्र आणि गरजू कुटुंबांपर्यंतच पोहोचावे, या उद्देशाने अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष तपासणी आणि पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. आता केवळ कागदपत्रांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. संशयास्पद, चुकीच्या किंवा नियमबाह्य आढळणाऱ्या नोंदी थेट संगणक प्रणालीतून वगळल्या जाणार आहेत.
या विशेष मोहिमेचा कणा म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया. आधारशी रेशन कार्ड लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना भविष्यात रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने ग्रामपातळीपासून शहरांपर्यंत या माहितीचा व्यापक प्रसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून कोणतेही पात्र कुटुंब केवळ माहितीअभावी लाभापासून वंचित राहू नये.
ई-केवायसी करा; अन्यथा कार्ड होईल बंद
पात्र लाभार्थ्यांना रेशनकार्डवर मिळणारे अनुदानित धान्य आणि इतर अन्नपदार्थ लाभ सुरू ठेवण्यासाठी रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. आधारकार्ड रेशनकार्डसोबत जोडणे, तपशीलांची पडताळणी करण्यासाठी आणि फक्त पात्र लाभार्थ्यांकडेच रेशनकार्ड आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. आधार कार्ड आणि रेशनकार्ड लिंकिंगची पडताळणी केल्याने फसवणूक दूर होण्यास आणि अन्न व संसाधन वितरणात पारदर्शकता राखण्यास मदत होते. ई-केवायसी सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अंतर्गत फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल याची हमी देते.
जर ई-केवायसी निर्धारित वेळेत पूर्ण झाले नाही तर लाभार्थ्यांना त्यांचे रेशन मिळू शकणार नाही. काही प्रकरणांमध्ये रेशनकार्ड रद्द होऊ शकते.रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे स्वत:चे आधारकार्ड सादर करणे, बायोमॅट्रिक्स करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्डची ई-केवायसी केली नसेल तर ती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्या…





