दहावीनंतर यंदा एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला. गेल्या काही वर्षांपासून ‘स्कुल कनेक्ट’ सारख्या उपक्रमांमुळे पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. पॉलिटेक्निकच्या हिवाळी सत्राच्या परीक्षाही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे या परिक्षांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पॉलिटेक्निक परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
यंदा राज्यभरात विक्रमी प्रवेश झालेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी राज्यभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असलेल्या निवडणुकांची झळ या परीक्षांना बसणार आहे. राज्यभरात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकांमुळे पॉलिटेक्निकच्या १ आणि २ डिसेंबरच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) घेतला आहे. आता हे पेपर ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहेत.
हे ही वाचा
राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद, नगरपंचायत, आणि नगरपालिकांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. या निवडणुका लक्षात घेत निवडणुकीच्या आदला दिवस, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि त्यापुढील एक दिवस अशा तीन दिवसांत परीक्षा घेणे शक्य नाही. पॉलिटेक्निकच्या वेळापत्रकानुसार १ आणि २ डिसेंबर रोजी परीक्षा नियोजित होती. पण आता निवडणुकीचा विचार करून एमएसबीटीईने या दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. जाहीर एमएसबीटीईने केलेल्या पत्रकानुसार, याआधी १ डिसेंबर रोजी होणारा पेपर ४ डिसेंबरला होणार आहे, तर २ डिसेंबर रोजीची परीक्षा ५ डिसेंबरला घेतली जाईल. या बदलाची दखल विद्यार्थ्यांनी घेऊन नियोजन करावे, असे आवाहन एमएसबीटीईचे सचिव उमेश नागदेवे यांनी केले आहे.
प्रशासन निवडणुकीच्या कामात प्रचंड व्यस्त
महाराष्ट्रात प्रशासन सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामात प्रचंड व्यस्त आहे. नगरपरिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची तयारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि सुरक्षा व्यवस्थेची आखणी यांसारखी महत्त्वाची कामे वेगाने सुरू आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. नागरिकांना पारदर्शक आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडता यावी यासाठी अधिकारी सातत्याने बैठका, प्रशिक्षण सत्रे आणि तपासणी मोहीम राबवत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रशासनिक कर्मचारी दिवसरात्र तयारीत गुंतले असल्यामुळे अन्य नियमित कामांवरही काही प्रमाणात परिणाम होत आहे.