लाखो लाडक्या बहिणींना सरकारने मोठा झटका दिला आहे. अपात्र महिलांची मोठी यादी जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. खोटी माहिती, बनावट दस्तऐवज आणि नियमभंग केल्यामुळे प्रशासनाने मोठा सर्व्हे करून एकाच झटक्यात लाखो महिलांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
1.5 लाख महिला योजनेतून बाहेर
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मुळे महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता या योजनेतून राज्यातील सुमारे सव्वा लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. अनेक दिवसांपासून यासंदर्भात सातत्याने पडताळणी सुरू होती. त्यानंतर आता ही मोठी घडामोड समोर येत आहे. योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू केलं. यासाठी तब्बल 6-7 लाख अंगणवाडी सेविकांना कामाला लावण्यात आलं. त्यांनी गावागावात, घराघरात जाऊन लाभार्थी महिलांची माहिती गोळा केली आणि लबाड लाडक्या बहीणींचा शोध घेवून त्यांना थेट अपात्र ठरवण्यात आलं आहे.
अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ
राज्यभरातील 1183 जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने सरकारला दिली. या कर्मचाऱ्यांवर नागरी सेवा नियमांतर्गत कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, बोगस माहिती देत लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपये घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. लाभार्थी महिलांची स्क्रुटीनी होत असून दररोज नव्याने बोगस लाभ घेणारे लाभार्थी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल 26 लाख लाभार्थी बोगस असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता येणारे पैसे अपात्र महिलांना वगळूनच मिळतील असा अंदाज आहे.
त्यामुळे या योजनेमध्ये भविष्यात आणखी काही मोठी कारवाई होते का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपात्र ठरलेल्या महिलांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. नावे अचानक योजनेतून वगळण्यात आली, त्या सध्या महिला व बाल विकास कार्यालयांच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारत आहेत. आम्हाला योजनेतून नाव वगळण्यात येणार आहे, याची कुठलीही पूर्वसूचना दिली नाही, असा आरोप अनेक महिलांनी केला आहे.





