मुंबईत लोकल रेल्वेच्या मार्गांवर जम्बो ब्लॉक; लोकल रेल्वेची सेवा विस्कळीत, प्रवाशांची तारांबळ

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईत लोकल रेल्वेच्या मार्गांवर जम्बो ब्लॉक; लोकल रेल्वेची सेवा विस्कळीत, प्रवाशांची तारांबळ

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर विविध तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांच्या वेळापत्रकावर गंभीर परिणाम होणार आहे. काही ठिकाणी लोकलची सेवा पूर्णपणे बंद अथवा विस्कळीत असल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ होताना दिसत आहे.

रविवारचा मेगाब्लॉक आणि प्रवाशांची तारांबळ

मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी त्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावतात किंवा रद्द होतात. प्रवाशांना लांब रांगा, गर्दी, उशीर आणि असुविधा यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पर्यायी प्रवास व्यवस्था नसल्याने कामावर जाणारे आणि प्रवास करणारे लोक अडचणीत सापडतात.

मध्य रेल्वेवरील जलद मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा आणि मुलुंड या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत, सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यानंतर त्यात्यांच्या निश्चित स्थानकांपर्यंत पोहोचतील. तर ठाणे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या बदलामुळे जलद लोकल नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा धावण्याची शक्यता आहे.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा पूर्णपणे रद्द

ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना सर्वाधिक गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कारण येथे सेवा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ही ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान याचा फटका बसणार आहे. ठाणे–वाशी–नेरूळदरम्यान धावणारी ट्रान्स-हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा या कालावधीत पूर्णपणे रद्द राहणार आहे. प्रवाशांनी या वेळेत प्रवास टाळावा किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेवर धीम्या मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक १ ते ४ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. ज्यामुळे गाड्यांच्या वेळेवर परिणाम होऊ शकतो.

वेळापत्रक पाहून प्रवास करा!

या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.