पुणे शहरातील पार्किंगची समस्या ही गेल्या काही वर्षांत अत्यंत गंभीर बनली आहे. शहराची लोकसंख्या, वाहने आणि व्याप वाढत असताना पार्किंगच्या सोयी मात्र तितक्या प्रमाणात वाढल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र आता या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महापालिका सरसावली आहे. त्यामध्ये काही महत्वपूर्ण पाऊले उचलण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे.
6 ठिकाणी पे अँड पार्क सुविधा सुरू होणार
सात वर्षे रखडलेली पुण्यातील पे अँड पार्क वाहनतळ योजना अखेर प्रत्यक्षात येत आहे. पुणे महापालिकेने अंमलबजावणीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत सहा रस्त्यांसाठी निविदा जाहीर केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच दिलेल्या मंजुरीनंतरही विविध कारणांमुळे ही योजना अडगळीत पडली होती. मात्र, वाढती वाहनसंख्या, पार्किंगची कमतरता आणि वाहतूक कोंडीचा वाढता ताण पाहता अखेर प्रशासनाने हा निर्णय गतीने राबविण्याचा मार्ग निवडला आहे.
हे ही वाचा
पे अँड पार्क – लोकेशन्स आणि शुल्क
ठेकेदार निवडीसाठी आठ दिवसांचा कालावधी दिला असून, पात्र ठरणाऱ्या ठेकेदाराला तीन वर्षांचा कालावधी कराराद्वारे देण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर निवडलेले सहा रस्ते पुढीलप्रमाणे असून जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी, बालेवाडी हायस्ट्रीट आणि विमाननगर परिसर. यावर नगरपालिका निश्चित दरांनुसार पार्किंग व्यवस्था निर्माण करणार आहे.
दर निश्चितीमध्ये दुचाकीसाठी प्रतितास 4 रुपये तर चारचाकीसाठी प्रतितास 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे दर महापालिकेच्या विद्यमान मक्ता पद्धती वाहनतळांच्या दरांपेक्षा (दुचाकी 8 रुपये व चारचाकी 14 रुपये) अधिक आहेत. मात्र, पे अँड पार्कसाठी रस्त्यावर उपलब्ध होणारी सोय, देखरेख आणि नियंत्रण या दृष्टीने हे शुल्क वाजवी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
पार्कींगच्या समस्येचे निराकरण होणार?
पुणे शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, तसेच नियोजनाचा अभाव यामुळे रस्त्यांवर अव्यवस्थित पार्किंग वाढले आहे. बाजारपेठा, कार्यालयीन परिसर, रुग्णालये आणि शाळांजवळ वाहन उभे करण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे वाहतुकीत अडथळे, कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांचा वेळ व इंधनाचा अपव्यय वाढतो.
बालेवाडी हायस्ट्रीटवर 199 चारचाकी तर दुचाकीसाठी 888 तर बिबवेवाडीत 920 दुचाकीसाठी तर चारचाकी वाहनांची मर्यादा 75, जंगली महाराज रस्ता दुचाकी 856, चारचाकी 51, फर्ग्युसन रस्त्यावर दुचाकीसाठी 804 तर चारचाकी 108 तसेच विमान नगर रस्त्यावर दुचाकी वाहन 490 तर चारचाकी 185 मर्यादा आहे. लक्ष्मी रस्त्यावर दुचाकीसाठी 238 तर चारचाकीसाठी 60 वाहनांना जागा उपलब्ध होणार आहे.
या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने पे अँड पार्कची सुविधा सुरू केली आहे. मात्र यामध्ये मर्यादीत वाहनांनाच लाभ मिळेल, त्यामुळे पार्कींगचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशी कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे पार्कींगच्या समस्येचे निराकरण होण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही, असे मत पुणेकर नागरिकांचे आहे.