लाडक्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याचे 1500 लांबणीवर पडणार की वेळेत खात्यामध्ये येणार? e-kyc नसेल तर…

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र पुरग्रस्तांना सरकारने बराच निधी दिला असल्याने या महिन्याचे १५०० उशिरा खात्यामध्ये येणार का, असा सवाल उभा राहिला आहे.
लाडक्या बहिणींचे सप्टेंबर महिन्याचे 1500 लांबणीवर पडणार की वेळेत खात्यामध्ये येणार? e-kyc नसेल तर…

लाडकी बहीण योजनेतील महिलांना सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळण्याची उत्सुकता आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता थोडा उशिराने मिळाला होता, त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता वेळेवर येईल अशी आशा होती. पण आता महिना संपायला काहीच दिवस उरले आहेत आणि अजूनही सरकारकडून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. यामुळे अनेक महिला चिंतेत आहेत. दुसरीकडे पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारने उपलब्ध असलेल्या निधीतील काही निधी वापरला आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्याचा हप्ता लेट मिळणार का, असा सवाल आता महिलांच्या मनामध्ये उभा राहिला आहे.

सप्टेंबरचे 1,500 कधी मिळणार?

सप्टेंबरचा हप्ता उशिरा मिळण्यामागे एक मोठे कारण म्हणजे ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया. सरकारने सांगितले आहे की, प्रत्येक महिलेनं आपली ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर त्या महिलेला या योजनेचा फायदा पुढे मिळणार नाही आणि तिचे पैसे थांबतील. म्हणूनच, हप्ता तेव्हाच जमा होईल जेव्हा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

ई-केवायसी करणे खूप सोपे आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर सुरू आहे. महिलांनी वेळेत ई-केवायसी केली नाही तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणतीही उशीर न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा करू शकतात. त्यानंतरच सप्टेंबरच्या हप्त्याची अचूक तारीख कळेल. त्यामुळे, ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लगेचच ई-केवायसी करून घ्यावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. दुसरीकडे पुरग्रस्तांना निधी वितरीत केल्याचा कोणताही परिणाम या योजनेच्या हप्यावर होण्याची शक्यता नाही.

फसवून पैसे मिळवले; वसूली होणार?

राज्यात अनेक महिलांनी शासनाला फसवून, खोटी माहिती भरून पैसे लाटल्याची आकडेवारी समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता शासन अशा अपात्र लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी कोणती कारवाई अपेक्षित नाही.