Marathi News

लाडकी बहिण योजनेचे मे महिन्याचे पैसे आले का? ‘या’ तारखेला रक्कम जमा होण्याची शक्यता

Written by:Rohit Shinde
Published:
लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. चालू महिन्याचे पैसे कधी जमा होणार? असा सवाला आता उपस्थित केला जात आहे.

लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय योजना. परंतु गेले दोन महिने या योजनेचा हप्ता उशिरा महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता मे महिना संपायला अवघे 4 दिवस उरले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘लवकरच पैसे मिळणार’

याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्वाचं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी 3.37 कोटींच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील.

महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेत आतापर्यंत 10 हप्ते मिळाले आहेत. आता मे महिन्याचा अकरावा हप्ता लवकरच जमा होणार आहे. या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोणत्या तारखेला मिळेल हप्ता?

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटी 25 ते 30 तारखेपर्यंत जमा झाले आहेत. या वस्तुस्थितीचा विचार करता  मे महिन्याचा हप्ता देखील महिनाअखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मे महिना संपण्यास आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर होईल.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. तसेच, काही प्रकरणांमध्ये पुरुषांच्या नावाने बँक खाती उघडून फसवणूक झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा अपात्र आणि फसवणूक करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत. अशा महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळवणाऱ्या महिलांना यामुळे दणका बसणार आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews