उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला; पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात घट!

Written by:Rohit Shinde
Published:
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवत आहे. पश्चिम-उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानामध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला; पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात घट!

राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात तापमानात घट कायम राहणार असून बहुतांश भागांत कोरडे आणि निरभ्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडे थंडी वाढत असून पारा सातत्याने घसरत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह येत असल्याने गारठा कामय आहे.  भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका अजून वाढेल. महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला. दुसरीकडे दक्षिण भारतातील काही राज्यांत तुरळक पावसाची शक्यता आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर या भागात पुढील काही दिवसांमध्ये पारा अधिक घसरण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडे थंडी वाढली की, महाराष्ट्र देखील थंडी वाढते. महाराष्ट्रात हिम लाट येणार असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढलेल्या गारठ्यामुळे सकाळच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झालंय.

उत्तर – पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका

धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 6.1 अंश सेल्सयस नोंदवला गेला. दिवसागणित तापमान खाली येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरात तापमानाचा पारस 6.1°c नोंदवला गेले. शाळेचे वेळ बदलण्याची मागणी पालकांनी केली आहे. शीतलहरीकडे शहराची वाटचाल सुरू आहे. येणारे काही दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. धुळ्याच्या आजूबाजूचे जिल्हे जसे की नंदुरबार, जळगावमध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती सध्या आहे. पुणे जिल्ह्यातही तापमान 9 अंशांच्या घरात पोहोचले आहे. सातारा, सांगली, सोलापूर पट्ट्यातही तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे.

मराठवाडा –  विदर्भातही तापमानात घट

आज मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाही. मात्र थंडीचा कडाका कायम असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीडमध्ये पारा चांगलाच घसरला आहे. आज कोरडं आणि थंड हवामान कायम राहील. आकाश पूर्णपणे स्वच्छ राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्याचेही कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तिकडे पूर्वेकडे नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांतही तापमानाचा पारा 10 अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. नागरिकांना आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सार्वजनीक आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews