Marathi News

सावधान! महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक थंडी पडणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रासाठी तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
सावधान! महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक थंडी पडणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

यंदा देशभरात खरंतर रेकॉर्ड ब्रेक थंडी पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या तीव्र शीतलहरीचा प्रभाव जाणवत असून अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. पहाटे आणि रात्रीच नव्हे तर दिवसभर वातावरणात गारठा कायम असल्याचे चित्र आहे. वाढलेल्या थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

काही दिवसांपासून राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठा जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यभरातील तापमानात कमालीची घसरण झाल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवू लागली असून राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे. उद्या 22 डिसेंबर रोजी देखील राज्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक थंडी पडणार ?

महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या शीतलहरीची स्थिती निर्माण झाली असून किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. अनेक ठिकाणी पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने दिवसभर गारवा जाणवत आहे. या थंडीमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता असून हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभर थंडीचा प्रभाव जाणवत असला तरी पुणे व पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये थंडीची तीव्रता वेगवेगळी आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये सकाळी धुके आणि दिवसा कोरडे हवामान राहणार आहे. पुणे, सोलापूरमध्ये गारठा अधिक असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी 22 डिसेंबर रोजी राज्यात ही थंडीची लाट जाणवणार असून पुढील काही दिवस तापमान कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहाटे आणि सकाळच्या वेळेत गारठा अधिक तीव्र राहणार असल्याचा अंदाज आहे. या शीतलहरीचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच आजार असलेल्या व्यक्तींवर होण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे किंवा रात्री वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांनाही धुक्यामुळे अडचणी येऊ शकतात. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि वातावरणातील आर्द्रतेत घट झाल्याने राज्यात शीतलहरीची स्थिती निर्माण झाली आहे. स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान यामुळे रात्री उष्णता झपाट्याने कमी होत असून किमान तापमान घसरत आहे.

थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !

सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews