Marathi News

राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी विभागाचं आवाहन, कारण काय?

Written by:Rohit Shinde
Published:
चांगला पूर्वमोसमी पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग पेरणीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. परंतु, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
राज्यातील  शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी विभागाचं आवाहन, कारण काय?

राज्यात सध्यस्थितीली तुफान पाऊस सुरू आहे, कमी अधिक फरकाने राज्याच्या सर्वच भागात पूर्वमोसमी पावसाने चांगली हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला तर पावसाने झोडपून काढलं. मान्सून अनेक वर्षांचा विक्रम मोडत कोकणात दाखल झाला. आता शेतकरी वर्ग पेरणीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. परंतु, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. नेमकं कारण काय? सविस्तर जाणून घेऊ

मान्सूनची गती मंदावणार

या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही. या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो.या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुबार पेरणीचं संकट टाळा

पावसाने ओढ दिल्यास अथवा काही भागात मान्सूनचा पाऊस लवकर दाखल न झाल्यास पेरणी वाया जाण्याची भिती आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी 15 जून नंतरच्या काळातील पावसाची परिस्थिती लक्षात घेत पेरणी करावी. जेणेकरून कोणत्याही आर्थिक नुकसानीची शक्यता राहणार नाही. हवामान आणि कृषी विभागाच्या सुचनेकडे शेतकऱ्यांनी वारंवार लक्ष ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून हवामानाचा योग्य वेध घेत शेतकरी पेरणी करू शकतील. दुबार पेरणीचं संकट टळेल.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews