Marathi News

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात पावसाचा जोर कमी अधिक फरकाने कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे. अशा परिस्थितीत आता हवामान विभागाच्या आजच्या पावसाबाबतचा अंदाज समोर आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि आजुबाजूच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढच्या 24 तासांमध्ये पावसाची काय स्थिती राहिल? रेड अलर्ट कुठे जारी करण्यात आला? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

हवामान विभागाने आज प्रामुख्याने राज्यातील तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणासह राज्यात अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात 27 मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यातील सातारा वगळता उर्वरीत तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे.  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे इथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्याला पाऊस झोडपणार?

मराठवाडा आणि आजुबाजूच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये 27 मे रोजी कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  लातूर, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.

पावसामुळे नागरिकांची दैना

काल 26 मे रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. मुंबईत तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. मुंबईत सोमवारी पावसामुळे लोकल काही काळ रखडली होती. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पण संध्याकाळनंतर पाऊस थांबल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. बारामतीत जेवढा पाऊस दोन महिन्यांमध्ये पडतो तितका एका दिवसात पडला आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. उमरगा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, परंडा, लोहारा या भागात पावसाने हजेली लावली. उमरगा शहरातील सखल भागात पाणी साचले. पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये झाड कोसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस झाला आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews