Marathi News

महाराष्ट्रातील थंडीबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट; थंडीत वाढ होणार ?

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तापमान 10 अंशाच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील थंडीबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट; थंडीत वाढ होणार ?

उत्तर भारतात दाट धुके आणि तीव्र थंडीचा कहर सुरू असताना, महाराष्ट्रात थंडी वाढणार की कमी होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार 21 ते 25 डिसेंबरदरम्यान राज्यात थंडीचा संमिश्र प्रभाव राहणार आहे. काही भागांत शीतलहरीचा इशारा देण्यात आला असून, काही जिल्ह्यांत तापमान स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

काही दिवसांपासून राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठा जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यभरातील तापमानात कमालीची घसरण झाल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत नागरिकांना जाणवू लागली असून राज्यभर हिवाळ्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे. उद्या 21 डिसेंबर रोजी देखील राज्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

राज्यातील थंडी वाढण्याचा अंदाज; अलर्ट जारी

21 ते 25 डिसेंबर या कालावधीत राज्यातील काही भागांत थंडीचा जोर वाढेल, तर उर्वरित भागांत हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘कोल्ड वेव’चा इशारा देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागांत 21 आणि 22 डिसेंबर रोजी कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबरनंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढू शकतो. दरम्यान, दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग तुलनेने अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हा बदल 21 डिसेंबरपासून सुरू होऊन 25 डिसेंबरपर्यंत जाणवेल. विशेषतः 21 आणि 22 तारखेला मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक राहणार असून, 25 तारखेनंतर उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढण्याचे संकेत आहेत. हा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला असून, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनीही पुढील सात दिवसांत तापमानात मोठे चढ-उतार होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिक, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेले रुग्ण यांच्यासाठी हा काळ अधिक काळजीचा असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !

सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews