MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Ladki Bahin Yojana: टेन्शन संपलं! लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ !

Written by:Rohit Shinde
Published:
ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.
Ladki Bahin Yojana: टेन्शन संपलं! लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत लाखो महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळते. लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. याच संदर्भात आता एक महत्त्वाची नवी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

ई-केवायसीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तथापि, अलीकडील काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच लाभार्थी महिलांकडून आलेल्या विविध अडचणींमुळे सरकारला ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ई-केवायसीसाठी दिलेली अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर 2025 ही निश्चित केलेली अंतिम तारीख होती, मात्र आता ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री आदिती तटकरेंकडून मुदतवाढीची घोषणा

‘माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे.

या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!

योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.

  • लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
  • संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
  • तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.

यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.