Mango Season: सततच्या पावसाचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम; आंबा बागायतदार आणि व्यापारी चिंतेत

Written by:Rohit Shinde
Published:
आंबा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आंब्याचा सीझन आणखी लांबणार म्हणजे महिना नाही तर कदाचित दीड दोन महिने सुद्धा लांबू शकतो'.
Mango Season: सततच्या पावसाचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम; आंबा बागायतदार आणि व्यापारी चिंतेत

सततच्या पावसामुळे आंबा बागांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो. जास्त आर्द्रतेमुळे झाडांच्या मुळांमध्ये कुज येते आणि झाडांची वाढ मंदावते. फुलोऱ्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे फळधारणा कमी होते. सततच्या ओलसर वातावरणामुळे आंब्याच्या फळांवर डाग, कुज आणि कीड लागण्याची शक्यता वाढते. यामुळे उत्पादनात घट येते आणि गुणवत्ताही कमी होते. अशीच काहीशी परिस्थिती सध्या राज्यातील आंबा उत्पादक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार आणि व्यापारी देखील चिंतेत आहेत. यंदा आंब्याची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत दिसून आंबे महाग होण्याची शक्यता आहे.

आंबा उत्पादनावर गंभीर परिणाम

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आंब्याचा सीझन आणखी लांबणार म्हणजे महिना नाही तर कदाचित दीड दोन महिने सुद्धा लांबू शकतो’. पावसामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली आहे, कारण या प्रक्रियेसाठी कडाक्याच्या थंडीची आवश्यकता असते. जोपर्यंत पाऊस थांबून थंडी सुरू होत नाही, तोपर्यंत मोहोर येणार नाही. यामुळे यंदा हापूस आंब्याचा हंगाम एक ते दीड महिने लांबणीवर पडणार असून आंब्याच्या उत्पन्नातही मोठी घट होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आंब्याच्या बागांचे पावसाने नुकसान

अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायत शेतकऱ्यांना बसलेला आहे. सर्व काही नुकसानीचे होत असताना आता या गुलाबी थंडीने आंबा बगायत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सध्याच्या थंडी आणि कडक ऊनावरच आंब्याचा मोहर अवलंबून आहे. आता ही थंडी कीती काळ टिकून राहते यावर सर्वकाही अवलंबून आहे. दरम्यान सध्या तरी आंबा उत्पादक आणि बागायतदार आणि चांगल्या थंडीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका कधी वाढणार, यावर खरंतर पुढील आंब्याच्या सिझनचे भवितव्य अवलंबून असणार आहे. हे यावरून स्पष्ट होते.