लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता, आता लग्न करताना ‘या’ गोष्टींचे पालन करण्याच्या सूचना

Written by:Rohit Shinde
Published:
मराठा समाजाने आता लग्नासंदर्भात आचारसंहिता जारी केली आहे. यामुळे आता थाटा-माटाला काहीसा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता, आता लग्न करताना ‘या’ गोष्टींचे पालन करण्याच्या सूचना

पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणानंतर राज्यात एकच खळबळ माजली. हुंडा प्रथा आणि आर्थिक देवाणघेवाणी चव्हाट्यावर आल्या. त्यानंतर आता राज्यातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी एक बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये मराठा समाजातील विवाहाबाबतच्या अनेक मुद्द्यावर विचारविनिमय करण्यात आला. अहिल्यानगर येथे एक बैठक पार पडली. ‘प्री-वेडिंग’ बंद करा, लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी; हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने अशी काहीशी आचारसंहिता जारी केली आहे.

आचारसंहितेत नेमकं काय?

लग्नसमारंभात मराठा समाजाने सुचवलेली आचारसंहिता वाचून दाखवावी. लग्न, साखरपुडा आणि हळद हे एकाच दिवशी घ्यावीत, असा ठराव पत्रकार परिषदेत मांडण्यात आला. हुंडा देऊ नये. त्याऐवजी, मुलीच्या नावाने मुदत ठेव करावी. पैशांसाठी मुलीचा छळ करू नये.  असे निर्देश देण्यात आले आहेत. लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मुलींनी मोबाइलचा वापर गरजेपुरताच करावा. ‘प्री-वेडिंग’ प्रकार बंद करावा. जर प्री-वेडिंगचे फोटो किंवा व्हिडिओ लग्नात स्क्रीनवर दाखवले गेले, तर सर्व समाजाने लग्नातून बहिष्कार टाकावा. लग्न सोहळा 100 ते 200 लोकांमध्येच साजरा करावा. डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये आणि लोक कलावंतांचा वापर करावा. लग्न सोहळा वेळेवरच पार पाडावा.

बैठकीला उपस्थित मान्यवर

या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सकल मराठा समाजाचे चंद्रकांत गाडे, अखिल भारतीय मराठा संघाचे संभाजी राजे दहातोंडे, उद्योजक आणि लेखक एन. बी. धुमाळ, इंजिनिअर सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्षा राजश्री शितोळे, पत्रकार किशोर मरकड, अशोक कुटे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

या बैठकीतून मराठा समाजाने विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक सलोखा आणि साधेपणा जपण्याचा संदेश दिला आहे. तसेच, हुंडा आणि आर्थिक छळासारख्या समस्यांवर कठोर भूमिका घेत महिलांच्या सन्मानाचे आवाहन केले आहे. मराठा समाजाने घेतलेल्या बैठकीनंतर आता पुढील काळात होणारे विवाह हुंडा न देता होतील की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशामध्ये हुंडाबळी अनेक मुलींना आपला जीव गमावा लागत आहे. त्यातच अनेक संसार देखील उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे. हुंडा पद्धत बंद होण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी आवाज उठवला होता. त्यानंतर 1961 साली हुंडा बंदी कायदा आला. या कायद्याअंतर्गत हुंडा देणे आणि घेणे कायदेशीर गुन्हा आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर निर्णय

पुणे येथील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी अहिल्यानगर येथील सुवर्णम प्राईड येथे हरिभक्त पारायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आलं होते. या बैठकीत समाजातील विविध मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आणि समाजाला काही सूचना करण्यात आल्या.  त्यामुळे यापुढे मराठा समाजाला लग्ने करताना थाटा-माटाला काहीसा ब्रेक द्यावा लागणार आहे. याबाबत समाजातून कसा प्रतिसाद येतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews