मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी त्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावतात किंवा रद्द होतात. प्रवाशांना लांब रांगा, गर्दी, उशीर आणि असुविधा यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पर्यायी प्रवास व्यवस्था नसल्याने कामावर जाणारे आणि प्रवास करणारे लोक अडचणीत सापडतात. उद्या रविवारी, 28 डिसेंबर रोजी देखील मुंबईत मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर म्हणजेच मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारीमेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे.
रविवार, 28 डिसेंबर मेगाब्लॉक नियोजन
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 दरम्यान
परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
हार्बर मार्ग
कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर
कधी : सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान
परिणाम : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 दरम्यान आणि चुनाभट्टी / वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.43 दरम्यान वांद्रे / गोरेगावला जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द असतील. ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची प्रवाशांना मुभा आहे.
पश्चिम रेल्वेवरील 629 लोकल रद्द
कांदिवली – बोरिवली दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या कामासाठी 27 ते 29 डिसेंबरदरम्यान 629 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार – रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे आहेत. मुंबईत फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाला सामोरे जावे लागेल.
27 डिसेंबर रोजी रात्री 1 ते सकाळी 7 दरम्यान बोरिवली येथील अप आणि डाऊन जलद मार्गावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनेल कार्यान्वित करण्यासाठी एक मोठा नॉन-इंटर लॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान काही अप मेल / एक्स्प्रेस बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. तसेच, ब्लॉकनंतर बोरिवली स्थानकाचे फलाट क्रमांक 8 आणि 9 हे 29 डिसेंबरपर्यंत बंद राहतील. या ब्लॉकमुळे पाचवा मार्ग आणि बोरिवली फलाट क्रमांक 8 व 9 बंद असल्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
बोरिवली / अंधेरीच्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर रोजी 158 अप आणि 138 डाऊन अशा 296 लोकल फेऱ्या, 28 डिसेंबर रोजी 120 अप आणि 115 डाऊन अशा 235 लोकल फेऱ्या आणि 29 डिसेंबर रोजी 49 अप आणि डाऊन 49 अशा 98 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या सर्व लोकल सेवांमध्ये जलद, धीम्या लोकलचा समावेश आहे.
वेळापत्रक पाहून प्रवास करा!
या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.





