Sun, Dec 28, 2025

Ratnagiri News : रत्नागिरी समुद्रात 3 जण बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Published:
समुद्रात बुडालेले पर्यटक हे मुंबईचे होते. सुट्ट्या घालवण्यासाठी ते खास रत्नागिरीला आले होते. मिथ्या कुटुंबिय असं त्यांचं नाव आहे. गुहागरच्या समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला
Ratnagiri News : रत्नागिरी समुद्रात 3 जण बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Ratnagiri News : ख्रिसमस नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला जात आहेत. खास करून कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणच्या समुद्रकिनारी उतरून पाण्यात मनसोक्त आनंद घेण्याची हौस अनेकांना असते. मात्र आज हीच हौस एका कुटुंबाच्या जीवावर उठली. गुहागर येथील समुद्रात मनसोक्त आनंद घेत असताना एकाच कुटुंबातील तीन जण बुडाले. या संपूर्ण घटनेने रत्नागिरीत एकच खळबळ उडाली आहे. अथक परिश्रमानंतर दोघांना वाचवण्यात यश आलं, तर एकाचा यामध्ये दुर्दवी मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं? Ratnagiri News

समुद्रात बुडालेले पर्यटक हे मुंबईचे होते. सुट्ट्या घालवण्यासाठी ते खास रत्नागिरीला आले होते. मिथ्या कुटुंबिय असं त्यांचं नाव आहे. गुहागरच्या समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. दुपारी 12.30 च्या दरम्यान अमोल विजयकुमार मुथ्थू आपली पत्नी श्वेता व तेरा वर्षाचा मुलगा विहान याच्या सोबत समुद्रात पोहत होते. तिघेही समुद्राच्या पाण्यात मनसोक्त आनंद लुटत होते. हे करत असताना ते 80 मीटर खोल समुद्रामध्ये पोहत गेले आणि इथेच घात झाला. समुद्राच्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि तिघेही बुडाले. त्यावेळी त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाच्या ते लक्षात आलं. त्याने तातडीने याबाबत गुहागर नगरपंचायत आणि तहसीलदार यांना कळवलं. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर जीव रक्षक म्हणून काम करणारे प्रदेश तांडेल याला माहिती कळताच त्याने गुहागर वॉटर स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यासह तातडीने सुमारे एक किलोमीटर अंतर पार करत बुडणाऱ्या तिघांना पाण्याबाहेर काढले. Ratnagiri News

कुटुंबासोबतचे शेवटचे पर्यटन ठरलं –

पत्नी श्वेता अमोल मुथ्थू, वय 42, मुलगा विहान अमोल मुथ्थू, वय 13 या दोघांचे प्राण वाचले मात्र 42 वर्षीय अमोल मुथ्या यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अथक परिश्रमानंतरही अमोल यांना वाचण्यात स्थानिकांसह पोलिसांना अपयश आले. अमोल यांची कुटुंबासोबतची ही ट्रीप त्यांच्या आयुष्यातील शेवटची ट्रीप ठरली. समुद्रावर पोहण्याचा आनंद लुटताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी मुलगा या दोघांनाही या संपूर्ण घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. गुहागर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र अशा प्रकारच्या घटनेने पर्यटनाला गालबोट लागते. खरं तर खोल समुद्रात अंघोळीसाठी जाऊ नये अशा सूचना करूनही अनेक जण समुद्रामध्ये जातात.