Sun, Dec 28, 2025

Credit Score: नवीन वर्षात क्रेडिट स्कोअरच्या नियमांत होणार बदल; कर्जदारांना कसा होईल फायदा?

Written by:Rohit Shinde
Published:
क्रेडिट स्कोअरसंदर्भातील महत्त्वपूर्ण नवीन नियम जाहीर केले आहेत. जानेवारी 2026 पासून ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर दर 14 दिवसांनी अपडेट केला जाईल, ज्यामुळे आतापर्यंत 30–45 दिवसांची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होणार आहे.
Credit Score: नवीन वर्षात क्रेडिट स्कोअरच्या नियमांत होणार बदल; कर्जदारांना कसा होईल फायदा?

क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेचा महत्त्वाचा मापदंड आहे. बँका व वित्तीय संस्था कर्ज देताना सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतात. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट स्कोअरसंदर्भातील महत्त्वपूर्ण नवीन नियम जाहीर केले आहेत. जानेवारी 2026 पासून ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर दर 14 दिवसांनी अपडेट केला जाईल, ज्यामुळे आतापर्यंत 30–45 दिवसांची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. नवीन नियमांमुळे प्रीपेमेंट, कर्ज बंद होणे आणि ईएमआयसंबंधी बदल लवकर क्रेडिट स्कोअरवर दिसतील, ग्राहकांना कर्ज मिळवणे सोपे होईल आणि बँकांना जोखीम समजून घेण्यास मदत होईल.

क्रेडिट स्कोअरच्या नियमांत होणार बदल

RBI ने बँकांना आणि एनबीएफसींना निर्देश दिले आहेत की, ग्राहकांची क्रेडिट माहिती महिन्यातून किमान दोनदा क्रेडिट ब्युरोला पाठवावी. यामुळे प्रीपेमेंट, कर्ज बंद होणे, किंवा उशिरा ईएमआय भरण्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर त्वरित दिसेल. यामुळे कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. हे नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत. पूर्वी हे काम दर 30-45 दिवसांनी केले जात होते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअर अपडेटसाठी खूप प्रतीक्षा करावी लागायची. संपूर्ण भारतभर लागू होणारे हे नियम सर्व बँका, एनबीएफसी आणि क्रेडिट ब्युरोमध्ये अमलात येतील.
क्रेडिट स्कोअर सतत बदलत राहतो. नवीन कर्ज घेणे, ईएमआय वेळेवर भरणे, कर्जात डिफॉल्ट होणे किंवा बँकांच्या अहवालातील चुका यामुळे स्कोअर बदलतो. या नियमामुळे ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर त्वरित अपडेट्स मिळतील, ज्यामुळे बँका जोखीम अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील आणि ग्राहकांना वेळेत कर्ज मिळेल. क्रेडिट ब्युरो आणि बँका आता प्रत्येक अपडेट नंतर ग्राहकांना SMS किंवा ईमेल अलर्ट देतील. जर कोणी चुकीच्या नावाने कर्ज घेण्याचा प्रयत्न केला, तर लगेच माहिती मिळेल. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण 30 दिवसांत करणे बँकांसाठी बंधनकारक केले गेले आहे. जर हे झाले नाही, तर दररोज 100 रुपये नुकसान भरपाई ग्राहकाला मिळेल. तसेच, क्रेडिट माहिती दुरुस्त करण्याची विनंती केल्यास 30 दिवसांत अपडेट करणे आवश्यक आहे.

चांगल्या क्रेडिट स्कोअरचे फायदे कोणते ?

चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतात. बँका आणि वित्तीय संस्था अशा ग्राहकांवर जास्त विश्वास ठेवतात, त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज सहज मंजूर होते. चांगल्या स्कोअरमुळे कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची संधी वाढते, ज्यामुळे एकूण परतफेड कमी होते. क्रेडिट कार्डवर जास्त लिमिट मिळते आणि तातडीच्या गरजांसाठी निधी उपलब्ध होतो. कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होते आणि कागदपत्रांची अडचण कमी होते. एकूणच, चांगला क्रेडिट स्कोअर आर्थिक स्थैर्य आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

चांगला क्रेडिट स्कोअर कसा ठेवायचा ?

चांगला क्रेडिट स्कोअर ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरणे. क्रेडिट कार्डची वापर मर्यादा शक्यतो ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त होऊ देऊ नये. वारंवार नवीन कर्ज किंवा कार्डसाठी अर्ज करणे टाळावे, कारण त्यामुळे स्कोअर कमी होऊ शकतो. जुनी कर्जे वेळेवर फेडून बंद करावीत. नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट तपासून त्यातील चुका दुरुस्त कराव्यात. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवणेही चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी उपयुक्त ठरते.