मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी त्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावतात किंवा रद्द होतात. प्रवाशांना लांब रांगा, गर्दी, उशीर आणि असुविधा यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पर्यायी प्रवास व्यवस्था नसल्याने कामावर जाणारे आणि प्रवास करणारे लोक अडचणीत सापडतात.

उद्या रविवारी, 21 डिसेंबर रोजी देखील मुंबईत मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर म्हणजेच मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी ( २१ डिसेंबर ) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे.

उद्या लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे-कल्याण या दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत देखभाल-दुरुस्तीचे काम चालणार आहे. या दरम्यान या मार्गांवरून धावणाऱ्या अप आणि डाउन लांब पल्ल्याच्या गाड्या उपनगरीय मार्गाच्या जलद मार्गिकांवरून धावणार आहेत . त्यामुळे जलद तसेच धीम्या उपनगरीय लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे . या मार्गावरील गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. तसेच रविवारच्या मेगाब्लॉकमुळे काही फेऱ्या रद्द राहतील.

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान स. ११ ते दु. ४ या वेळेत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील १०.३३ ते १५.४९ दरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील ०९.४५ ते १५.१२ दरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील ११.०२ ते १५.५३ दरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील १०.०१ ते १५.२० दरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते कांदिवली या स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आज, शनिवार २० डिसेंबर ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत मेगाब्लॉक चालणार आहे. या ब्लॉकदरम्यान सहाव्या आणि पाचव्या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. हा ब्लॉक रात्री ११ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चालू राहणार आहे. या ब्लॉकचा भाग म्हणून रविवार, २१ डिसेंबरपासून दररोज रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ८० लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

वेळापत्रक पाहून प्रवास करा!

या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.