मुंबईत रेल्वे प्रशासनाकडून रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. या मेगाब्लॉकमध्ये दुरुस्ती, देखभाल आणि सिग्नल तसेच ट्रॅक बदलण्याचे काम केले जाते. पण या कामांमुळे अनेकदा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. रविवारीदेखील प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना, परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांना आणि कौटुंबिक कारणांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गाड्या उशिरा मिळतात किंवा मार्ग बदलून जावं लागतं. उद्या 12 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी मुंबईत लोकल रेल्वेच्या हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
रविवारी मेगाब्लॉक; प्रवाशांना मनस्ताप
रेल्वेचे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल प्रणाली आणि विविध अभियांत्रिकी कामे हाती घेण्यासाठी रविवारी हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याणदरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक होणार नाही, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा
हार्बर मार्ग (Harbour Line)
कुर्ला – वाशी (Kurla To Vashi) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन लोकल आणि पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप लोकल रद्द करण्यात येतील.
विशेष लोकलची व्यवस्था (Special Local Trains)
ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – कुर्ला आणि पनवेल – वाशी (Kurla, Panvel- Vashi) दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान हार्बर मार्ग प्रवाशांना ठाणे ते वाशी / नेरुळदरम्यान प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे (Western Line)
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली – राम मंदिर आणि राम मंदिर – कांदिवली स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे ब्लॉकच्या काळात सर्व अप जलद लोकल बोरिवली – अंधेरीदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर पाचव्या मार्गिकेवरील सर्व लोकल अंधेरी – बोरिवलीदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द होतील आणि काही लोकल अंधेरी – बोरिवलीदरम्यान हार्बर मार्गावरून गोरेगाव येथून वळवण्यात येतील.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर रविवारी कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावरील लोकलसेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रविवारचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे.
वेळापत्रक पाहून प्रवास करा!
या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.