पुणे मेट्रोला आता हळूहळू प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. सुरुवातीच्या काळात प्रवासी संख्येत थोडीशी मर्यादा होती, परंतु आता नागरिक मेट्रोचा वापर अधिक प्रमाणात करू लागले आहेत. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असून वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळत आहे. दररोज हजारो प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मेट्रोचा विस्तार जलद गतीने सुरू आहे. अशा संपूर्ण परिस्थितीत आत मेट्रोकडून आणखी एक कौतुकास्पद पाऊल उचलले जाणार आहे. पुण्यात लवकरच स्वयंचलित मेट्रो धावणार आहे. खडकवासला-स्वारगेट-खराडी दरम्यानच्या मेट्रो मार्गावर ही सेवा सुरु करण्याचा महामेट्रोचा मानस आहे.

लोकोपालयलट शिवाय धावणार मेट्रो

खडकवासला-स्वारगेट-खराडी या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला अंतिम मान्यता कधी मिळणार आणि त्याचे काम कधी सुरू होणार याची पुणेकर वाट पाहत असतानाच महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन म्हणजेच ‘महामेट्रो’ ने एक मोठी योजना आखली आहे. या सर्वाधिक लांबीच्या मार्गावर आता पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने मेट्रोचे संचलन केले जाणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ‘महामेट्रो’कडून एक सविस्तर अहवाल तयार केला जात असून या मार्गावर धावणाऱ्या सुमारे 25 मेट्रो ‘लोकोपायलट’ शिवाय चालवल्या जाण्याची शक्यता आहे.

अखेर पुणे मेट्रोचा वेगाने विस्तार सुरू

‘महामेट्रो’ सध्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीत टप्प्यांची कामे वेगाने पूर्ण करत आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी दरम्यानचे काम प्रगतीपथावर आहे, तर इतर मार्ग निविदा प्रक्रियेत आहेत. प्रस्तावित मार्गिकांपैकी खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी या सर्वात लांब मार्गावर आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. पुण्यात सध्या कार्यान्वित असलेल्या मार्गांवर मेट्रोचे संचलन ‘लोकोपायलट’द्वारे केले जाते. मात्र, नव्या टप्प्यासाठी मेट्रो ट्रेन पूर्णतः स्वयंचलित स्वरूपात कार्यान्वित करण्याची ‘महामेट्रो’ची योजना आहे. काही वर्षांपूर्वी दिल्लीत अशा प्रकारच्या मेट्रो संचलनाला सुरुवात झाली असून देशातील इतर काही शहरांमध्येही या आधुनिक प्रणालीचा वापर सुरू आहे. आता पुण्यात देखील ही प्रणाली आमलात आणली जाणार आहे.