मुंबई शहरातील वाढते हवा प्रदूषण हे आज गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. दररोज वाढणारी वाहने, बांधकामांची धुळ, औद्योगिक धूर, आणि कचरा जाळण्याच्या घटना यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असून श्वसनाचे आजार, दमा, खोकला, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे विकार वाढताना दिसत आहेत. अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये आता हिवाळा सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळताना दिसत आहे. याचा गंभीर परिणाम खरंतर नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली!
भारतीय हवामान विभागाने अद्याप पावसाळा संपण्याची अधिकृत घोषणा केली नसतानाही शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. मुंबईचा एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक AQI १०५ पर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे मान्सून काळात ‘चांगल्या’ श्रेणीत असलेली हवा आता ‘मध्यम’ श्रेणीत गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण आणखी वाढून ‘अत्यंत खराब’ स्तरावर पोहोचू शकते. विशेषतः हिवाळ्यात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषक घटक हवेत जास्त काळ टिकून राहतात, ज्यामुळे हवा अधिक धुरकट होते. महानगरपालिकेचे प्रदूषण नियंत्रण उपाय, जसे की धूळ नियंत्रण, वाहन तपासणी आणि हरित पट्टे वाढवणे, हे आवश्यक असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येतात.
AQI पातळी ०-५० दरम्यान चांगली, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० खराब, ३०१-४०० अत्यंत खराब आणि ४०० पेक्षा जास्त गंभीर मानली जाते. सध्या मुंबईतील हवा मध्यम श्रेणीत असून, काही ठिकाणी ती ‘खराब’ दिशेने सरकत आहे. त्यामुळे आगामी काळात ही स्थिती अधिक गंभीर स्वरूप धारण करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हिवाळ्यात मुंबईतील हवेचे प्रदूषण मागील काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असू शकते. हवामानातील बदलांमुळे वाऱ्यांचे स्वरूप विस्कळीत होईल आणि आधीच कमी असलेले वारे आणखी दुर्बल होऊ शकतात. AQI पातळी वाऱ्यांचा अभाव राहिल्यास ३५० च्या वर जाण्याची शक्यता आहे.
प्रदूषित हवा; आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
प्रदूषित हवेत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हवेत धुर, धुळ किंवा रासायनिक प्रदूषण जास्त असल्यास घरात राहणे, खिडक्या व दरवाजे बंद ठेवणे फायदेशीर ठरते. शक्य असल्यास एन-95 मास्क वापरणे हवेचे प्रदूषण श्वसनात येण्यापासून प्रतिबंध करते. दिवसभरात पाणी अधिक प्यावे आणि संतुलित आहार घ्यावा, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. श्वसनाची समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. घरात हवा शुद्ध करणारी उपकरणे किंवा झाडे लावणे उपयुक्त ठरते. बाहेर जास्त वेळ घालवणे टाळा आणि नियमित व्यायाम व योग करून शरीर व मन दोन्ही निरोगी ठेवा.






