नेरळ-माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सेवेत; माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा

Written by:Rohit Shinde
Published:
मे 2025 पासून भूस्खलनामुळे बंद असलेली नेरळ–माथेरान मिनी ट्रेन तब्बल सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागाने 6 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सेवेत; माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा

माथेरान या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणची पर्यटकांची आवडती नेरळ ते माथेरान धावणारी मिनी ट्रेन माथेरानची राणी मान्सुननंतर पुन्हा सुरु होत आहे. या मिनी ट्रेनचा सफर येत्या ६ नोव्हेंबरपासून बहाल करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सुरक्षेसाठी पावसाळ्यात या मिनी ट्रेनला जून ते ऑक्टोबर या काळात नेरळ ते माथेरान चालवण्यात येत नाही. या काळात अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सुरु असते. आता थेट नेरळ ते माथेरान अशी सलग सेवा ६ नोव्हेबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांचा फायदा होणार आहे.

०६ नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन पुन्हा सेवेत

पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मे 2025 पासून भूस्खलनामुळे बंद असलेली नेरळ–माथेरान मिनी ट्रेन तब्बल सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागाने 6 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे माथेरानच्या दऱ्यांमधून पुन्हा एकदा ‘हिल क्वीन’च्या शिट्टीचा आवाज घुमणार आहे. यामुळे पर्यटक आणि स्थानिक व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

मिनी ट्रेन बुकींग आणि वेळापत्रकाबाबत…

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, नेरळ-माथेरान मार्गावर दररोज दोन गाड्या धावतील. यातील पहिल्या गाडीत खास विस्टाडोम कोच जोडला गेला आहे ज्यामुळे पर्यटकांना डोंगर-दऱ्यांमधील निसर्गसौंदर्याचा आनंद चोहोबाजूने घेता येईल.
मार्ग ट्रेन क्रमांक सुटण्याची वेळ पोहोचण्याची वेळ
नेरळ-माथेरान (डाउन) 52103 08.50 वाजता 11.30 वाजता
नेरळ-माथेरान (डाउन) 52105 10.25 वाजता 13.05 वाजता
माथेरान-नेरळ (अप) 52104 14.45 वाजता 17.30 वाजता
माथेरान-नेरळ (अप) 52106 16.00 वाजता 18.40 वाजता

 

प्रवासी सेवेसोबतच, स्थानिक व्यापारी वर्गासाठीही रेल्वे विभागाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत मालवाहतूक करणारी विशेष मिनी ट्रेन सेवा नेरळ–माथेरान मार्गावर सुरू करण्यात येणार आहे.
  • नेरळहून सुटण्याची वेळ: सकाळी 7 वाजता
  • माथेरानहून परतीची वेळ: दुपारी 12.25 वाजता

 

शनिवार/रविवार साठी विशेष शटल सेवा देखील उपलब्ध असतील. मे महिन्यात दरडी कोसळल्यामुळे बंद झालेला मार्ग रेल्वे विभागाने सप्टेंबरपासून दुरुस्ती पूर्ण करून पुन्हा सुरळीत केला आहे.

माथेरानला पर्यटकांची मोठी पसंती

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक आहे. मुंबई आणि पुणेपासून जवळ असल्यामुळे येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. माथेरानची खासियत म्हणजे येथे कोणत्याही प्रकारची वाहन वाहतूक बंद आहे, त्यामुळे येथील निसर्ग अबाधित आणि शांत राहिला आहे. घनदाट जंगल, थंड हवामान, विविध पॉईंट्सवरून दिसणारे अप्रतिम दृश्य, आणि जुन्या ब्रिटिश काळातील वास्तू हे माथेरानचे मुख्य आकर्षण आहे. ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. त्यामुळेच माथेरानला पर्यटकांची सातत्याने पसंती मिळत आहे.