Marathi News

एसटीच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल; प्रवाशांना मिळणार सुखद प्रवासाचा अनुभव

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ताफ्यात काही नव्या बसेस लवकरच दाखल होत आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
एसटीच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल; प्रवाशांना मिळणार सुखद प्रवासाचा अनुभव

एसटीचे सर्वसामान्याच्या जीवन प्रवासाशी एक वेगळंच नात आहे. आणि आत याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे त्यानुसार,गेली अनेक वर्ष एसटीच्या ताफ्यात नवीन बसेसचा समावेश केला गेला नव्हता. परंतु आता राज्य परिवहन महामंडळाने नवीन बसेसची खरेदी केली आहे. आषाढी वारीत भाविकांना या नवीन बसेसमधून प्रवास करता येणार आहे. राज्यभरातून वारीसाठी दोन हजार बस धावणार आहेत. यामुळे वारकऱ्यांचा एसटी प्रवास सुखद होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या कारकिर्दीत एसटीमध्ये अनेक आमुलाग्र बदल होत आहेत.

नव्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय टळणार!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवीन लालपरी दाखल होत आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांना नवीन लालपरीचा सुखद प्रवास अनुभवता येणार आहे. काही वर्षांपूर्वी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत होत्या. मात्र, २०१६ नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झालीच नाही. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून जुन्या बसनेच आषाढी वारी, दिवाळी यांचा प्रवास सुरू होता. गेल्या काही वर्षांत आषाढी वारीत वारकऱ्यांना आणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लालपरीचा प्रवासाचा सुखद अनुभव येत नव्हता. मागील वर्षी पुणे विभागातून आषाढी वारीसाठी पुण्यातून पंढरपूरसाठी ३८० बस सोडण्यात आल्या. या सर्व बस जुन्या होत्या. परंतु आता नवीन बसेसची खरेदी झाली आहे. त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखद होणार आहे.

यंदा राज्यातील सर्व आगारांत एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत. पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल झाल्या आहेत. पुढील महिन्याभरात तेवढ्याच बस दाखल होणार आहेत. महामंडळाच्या ताफ्यात आतापर्यंत दीड हजार बस दाखल झाल्या आहेत. तसेच पुढील एक महिन्यात आणखी एक हजार बसेस येणार आहे.एसटी महामंडळाने तीन हजार नवीन बसेस घेतल्या आहे. या बसेस अत्याधुनिक आहेत. यामध्ये अनेक सुविधांचा समावेश केला आहे. तीन बाय दोन या पद्धतीने या बसेसची बांधणी करण्यात आली आहे. या बसमध्ये डिजिटल डॅशबोर्ड, सेन्सरयुक्त इंजिन, कॅमेरे, चार्जिंग पोर्ट्स दिले आहे. तसेच बसमध्ये काही बिघाड झाला तर ते शोधण्यासाठी संगणक प्रणाली आहे. या बसेस चेसिसवर न बांधता आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केल्या आहेत.

एसटीचे सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्व

महामंडळाची बस ही सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. ग्रामीण, आदिवासी तसेच शहरांमधील लोकांना सुलभ, सुरक्षित आणि स्वस्त प्रवासाची सुविधा एसटीमुळे मिळते. शाळा, कॉलेज, नोकरी, बाजारहाट किंवा आरोग्यसेवा यासाठी एसटी अत्यंत उपयुक्त ठरते. अनेक दुर्गम भागांमध्ये एसटी हाच एकमेव प्रवासाचा पर्याय असतो. गावकऱ्यांच्या जीवनाशी एसटीचं नातं अतूट आहे. आपत्कालीन प्रसंगी, पावसाळ्यात किंवा सणवाराच्या काळातही एसटी नियमित सेवा देते. त्यामुळेच एसटी ही फक्त एक वाहतूक सेवा नसून ती सामान्य माणसाच्या जगण्याचा आधार आहे. तिचं अस्तित्व टिकणं हे ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews