तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल किंवा साठवलेला कांदा बाजारात नेणार असाल तर तुमची चिंता वाढवणारी अशी एक बातमी समोर येत आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. याचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण, दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर एकीकडे राज्यामध्ये कांद्याच्या मागणीत वाढ जरी झाली असला तरी दुसरीकडे आवक देखील तेवढीच वाढत आहे. परिणाम कांद्याच्या दरामध्ये कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
कांद्याच्या दरामध्ये घसरण, शेतकरी अडचणीत
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 20 हजार 735 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 41 हजार 424 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 420 ते जास्तीत जास्त 1496 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1201 क्विंटल पांढर्या कांद्यास प्रतीनुसार कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 3200 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये तशी कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा डोंगर वाढताना दिसत आहे.
हे ही वाचा
कांद्याच्या दरामध्ये घसरण होण्याचा अंदाज
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी देशांनी स्थानिक उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे भारतातून निर्यातीला वाव उरलेला नाही. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता अत्यल्प आहे. उशिराने लागवड झाल्याने खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकातील कांद्याची आवक सुरू असून ती नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहील. या काळात जुना रब्बी कांदा आणि नवीन खरीप कांदा दोन्ही बाजारात येणार असल्याने, पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
राजस्थान, गुजरातच्या कांद्याची आवक वाढणार!
लवकरच राजस्थान आणि गुजरातमधूनही नवीन कांद्याचा पुरवठा वाढेल. या सर्व घटकांमुळे बाजारात कांद्याचा बंपर स्टॉक उपलब्ध होणार असून, त्यामुळे भाव आणखी कोसळू शकतात, असा इशारा कांदा निर्यातदारांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अशी बातमी समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.