शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आले आहेत. आगामी काळात होणाऱ्या सभेमध्ये याबाबत अधिक बोलू असे राज ठाकरे म्हणाले.
ठाकरे बंधुंच्या युतीची अधिकृत घोषणा
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अखेर बुधवारी घोषणा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे युतीच्या घोषणेकडे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.
ठाकरे बंधू नेमकं काय म्हणाले ?
कोण किती जागा लढणार, हे आम्ही आताच सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांनाही एक आवाहन केले. त्यांनी म्हटले की, ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहा, असे ते म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भाषण केले. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत, चिंधड्या करायच्या आहेत. आता आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलोय. आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी, हे मी पूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे अखेरीस ठाकरेंच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.





