सोयाबीनच्या दराबाबत बाजार समित्यांमधून सातत्याने नव्या अपडेट्स समोर येत आहेत. अशा परिस्थितीत आता दरामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात चढ-उताराचे चित्र पाहायला मिळाले. आज 25 डिसेंबर रोजी दरांची स्थिती नेमकी काय राहिली, ते जाणून घेऊ…
राज्यभरात सोयाबीनला समाधानकारक भाव
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही प्रमुख बाजारांत दर समाधानकारक पातळीवर राहिले असले, तरी मोठ्या आवकेमुळे काही ठिकाणी दरांवर दबाव जाणवला. एकूणच राज्यभरात सोयाबीनचे सरासरी दर 4,000 ते 4,800 रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेले दिसून आले. येवला बाजार समितीत 52 क्विंटल आवक नोंदवली गेली. येथे किमान दर 3,900 रुपये, तर कमाल 4,610 रुपये असून सरासरी दर 4,480 रु.मिळाला. लासलगाव-विंचूर येथे 368 क्विंटल आवकेसह दर 3,000 ते 4,761 रुपयांपर्यंत गेले असून सरासरी दर 4,700 रुपये राहिला. जळगाव बाजार समितीत 492 क्विंटल आवक असून सर्वच व्यवहार 5,328 रुपयांवर झाले, ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मर्यादित 26 क्विंटल आवक झाली. येथे दर 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान राहिले. माजलगाव बाजारात मोठी म्हणजेच 2,820 क्विंटल आवक झाली. मात्र तरीही दर स्थिर राहून किमान 3,500, कमाल 4,682 आणि सरासरी 4,400 रुपये मिळाले. चंद्रपूरमध्ये 55 क्विंटल आवकेसह सरासरी दर 4,280 रुपये राहिला. मराठवाड्यात लातूर, जालना आणि बीड या प्रमुख बाजारांत मोठी आवक असूनही दर तुलनेने चांगले राहिले. लातूर बाजारात तब्बल 8,732 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 4,900 व सरासरी दर 4,850 रुपये मिळाला. जालना येथे 5,490 क्विंटल आवकेसह दर 4,000 ते 5,200 रुपयांपर्यंत गेले. बीडमध्ये सरासरी दर 4,579 रुपये राहिला.





