पुणे आणि बंगळुरू ही दोन्ही शहरे देशातील महत्वाची आयटी आणि औद्योगिक केंद्रे म्हणून ओळखली जातात. पुणे हे शिक्षण, वाहन उद्योग आणि संशोधन क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे, तर बंगळुरूला “भारताचे सिलिकॉन व्हॅली” म्हटले जाते कारण तेथे अनेक जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि स्टार्टअप्स आहेत. दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यामुळे देशभरातून लोक येथे स्थायिक होत आहेत.
वाढत्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधा, वाहतूक आणि गृहनिर्माण क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे आर्थिक आणि तांत्रिक विकासाची प्रमुख केंद्रे ठरत आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही शहरांतील दळणवळण अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी पाऊले उचलली जात आहेत.
नव्या 8 पदरी महामार्गाची निर्मिती होणार!
पुणे ते बेंगळूर हा प्रवास केवळ 7 तासांत पूर्ण करण्याची हमी देणाऱ्या नव्या आठ पदरी महामार्गाचे काम 2026 मध्ये सुरू होणार आहे. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर बेळगाव ते बंगळूर हा प्रवासही केवळ 4 ते 5 तासांत पूर्ण करता येणार आहे. नव्या महामार्गाचे काम केवळ दोन वर्षांतच पूर्ण करण्याचेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नियोजन आहे. या महामार्गासाठी तब्बल 55 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.





