राज्यात पाऊस सुरूच राहणार; हवामान विभागाचा इशारा, पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे या पावसामुळे बागायती क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्यात पाऊस सुरूच राहणार; हवामान विभागाचा इशारा, पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे, राज्याला अवकाळीचा चांगलाच तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: बागायती क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. राज्यातील हा पावसाचा जोर पुढील आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस कायम राहिल, असा अंदाज आहे.

कुठे अन् किती बरसणार?

मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, धुळे, पुणे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, हिंगोली, सांगली, जालना, परभणी, भंडारा, बुलढाणा, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली,वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर , कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतीचं मोठं नुकसान

गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे, याचा मोठा फटका रब्बी हंगामातील धान पिकाला बसला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतात कापून ठेवलेल्या धानाच्या पेंढ्या पावसात भिजल्यानं त्या खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमरावतीमध्येही पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. अमरावती शहरामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सायंकाळी घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.  पावसामुळे संत्रा, कांदा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडे आणि विजेच्या तारा कोसळण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. राज्यात पुढील काही दिवस राज्यात असेच हवामान राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. झाडाखाली उभे राहू नये. तसेच वादळी वारे आणि पावसाच्या परिस्थितीत शक्यतो बाहेर पडू नये, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे वादळी पावसात योग्य ती काळजी घ्या…

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews