Marathi News

महाराष्ट्रातील ‘या’ 12 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

Written by:Rohit Shinde
Published:
आज 22 ऑक्टोबर रोजी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने 12 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ 12 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील राज्ये जसे की, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांत या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

12 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता

ऐन दिवाळीच्या उत्साहात आणि ऑक्टोबर हीटच्या तडाख्यात महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे काही दिवाळीच्या उत्साहावर काहीसं विरजन पडलं. पावसामुळे बाजारपेठा देखील मंदावल्या होत्या. त्यानंतर आज 22 ऑक्टोबर रोजी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने 12 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने जोरदार वारे आणि हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज राज्यातील खालील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे आणि ढगाळ राहून उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बुधवार, गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असून, या काळात मेघगर्जना देखील होऊ शकते. दक्षिण कोकणातील रत्नागिरी येथे शनिवारपर्यंत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट कायम राहील.

रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत

सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज

20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होऊ शकते. याशिवाय, छत्तीसगडमध्ये 20 ते 24 ऑक्टोबर आणि नागालँड, मणिपूर, मिजोरम व त्रिपुरा येथे 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews