महाराष्ट्रावर पावसाचे सावट कायम; मोंथा चक्रीवादळामुळे हवामानात बदल, आणखी किती दिवस पाऊस ?

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
दक्षिण भारताच्या भूमीवर सक्रिय असलेल्या मोंथा चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात काल दिवसभरात अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला. पुढील काही दिवस पावसाचे सावट कायम राहणार आहे.
महाराष्ट्रावर पावसाचे सावट कायम; मोंथा चक्रीवादळामुळे हवामानात बदल, आणखी किती दिवस पाऊस ?

बंगालच्या उपसागरावर असलेल्या “मोंथा” या तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक राज्यांतील अनेक जिल्ह्यांत हवामान बदल झाला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यातील 17 जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमध्ये देखील या काळात मुसळधार ते अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो.

महाराष्ट्रावरील पावसाचे सावट कायम

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 ऑक्टोबर रोजी  राज्यातील विविध भागांत जोरदार पावसाचा प्रभाव राहील. यात मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः विदर्भातील वाशीम आणि यवतमाळ वगळता सर्व नऊ पैकी सात जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट कायम आहे.

मोंथा चक्रीवादळामुळे पाऊस वाढणार !

आता मोंथा वादळाचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू असून, गुरुवारी हे क्षेत्र विदर्भालगत असेल. शुक्रवारी त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू राहील आणि त्याच दिवशी हे क्षेत्र युपी, बिहारच्या दिशेने सरकत सिक्कीमकडे वाटचाल करेल. त्यामुळे पुढील तीन दिवस या परिसरात पावसाची शक्यता आहे. वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचे संकेत आहेत.

फक्त विदर्भच नाही तर मराठवाड्यातील काही भाग आणि कोकण किनारपट्टीवर देखील पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देखील पावसाचा तडाखा बसणार आहे. शेती क्षेत्राचं अतोनात नुकसान सध्या होत आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात पिकांचे मोठे नुकसान या काळात झाले आहे.

पाऊस नेमकी कधी उघडीप देणार?

अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलामुळे विदर्भासोबत कोकण किनारपट्टीवर भागात पाऊस कायम आहे. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्रामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे.