सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदवली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. आज सोमवार, 05 जानेवारी रोजी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दराची नेमकी काय स्थिती राहिली, कुठे आवक किती झाली ? या बाबी सविस्तर जाणून घेऊ.
बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 58 हजार 005 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची 14 हजार 773 क्विंटल सर्वाधिक आवक लातूर मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4213 ते जास्तीत जास्त 4904 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. सोयाबीनला 5328 रुपये सर्वाधिक बाजार भाव जळगाव आणि सातारा मार्केटमध्ये मिळाला. रविवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज वाढ झालेली दिसून येत आहे.
जळगावमध्येच लोकल सोयाबीनच्या 279 क्विंटल आवकीसाठी किमान 4200 ते कमाल 4780 रुपये दर मिळाला असून, सर्वसाधारण दर 4700 रुपये राहिला. यावरून दर्जानुसार दरात लक्षणीय फरक दिसून येतो. नागपूर बाजार समितीत 922 क्विंटल लोकल सोयाबीनची मोठी आवक झाली. येथे किमान 4000 ते कमाल 4700 रुपये दर नोंदवण्यात आला असून, सरासरी दर 4525 रुपये राहिला. विदर्भातील काही भागांत दर्जेदार मालाला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी वाढलेल्या आवकेमुळे दरांवर दबाव जाणवत आहे.
सोयाबीनच्या दरात अस्थिरता नेमकी कशामुळे?
महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात अलीकडे कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल भिजला असून त्यामुळे उत्पादनाची प्रत ढासळली आहे. खराब गुणवत्तेमुळे बाजार समित्यांत दर घसरत आहेत. त्यातच बाजारपेठांमध्ये होणारी अस्थिर आवक आणि व्यापाऱ्यांचा कमी प्रतिसाद यामुळे भावात चढ-उतार वाढले आहेत. काही दिवशी आवक जास्त असल्याने दर कमी होतात, तर आवक घटली की अचानक वाढतात. या अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले असून स्थिर दर मिळण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आणि खरेदी धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.