महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा अनिश्चित काळासाठीचा संप आजपासून सुरू झाला असून, या आंदोलनामागे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्याची प्रमुख मागणी आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या मृत्यूनंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपामध्ये राज्यातील सुमारे 30 हजार निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत. डॉक्टरांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवरील अत्याचार, धमक्या आणि मानसिक छळाच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधत, त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या हिंसाचारामुळे वैद्यकीय क्षेत्र असुरक्षित होत चालल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
सरकारी रूग्णालयांची सेवा विस्कळीत
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने दिलेल्या संपाच्या हाकेमुळे राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमधील गैर-आपत्कालीन सेवा विस्कळीत होणार आहेत. मुंबईतील चारही महापालिकेच्या रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरही संपात सहभागी होत असल्याने बीएमसी रुग्णालयांमधील आरोग्यसेवांवर मोठा परिणाम दिसून येईल. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग सेवा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. संप लांबला, तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि इतर जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता आहे.
विविध मागण्यांसाठी डॉक्टर आक्रमक
संपदा मुंडे हिच्या कुटुंबाला 5 कोटींची मदत, जलदगती कोर्टात सुनावणी, आणि डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करावा अशा मागण्याही आहेत. आंदोलन सुरू असल्याने रुग्णालय परिसरात ओपीडी सेवा ठप्प झाली आहे, फक्त इमर्जन्सी विभाग सुरू असून त्यामुळे रुग्णांना मोठा फटका बसत आहे. आज फक्त ओपीडी सेवा बंद, पण न्याय न मिळाल्यास उद्या पासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करू असा इशारा डॉक्टरांनी सरकारला दिला असून प्रशासनावर डॉक्टरांचा रोष दिसून येत आहे.
मुंबईतील नायर रुग्णालयात रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थीने आंदोलन सुरू केले. बेटी पडी पर बची नहीं “नो सेफ्टी, नो सर्विस!” अश्या आशयाचे पोस्टर हातात घेत रेसिडेंट डॉक्टर आणि एमडी विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर घाटीतील मार्ड या संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद करण्यात आली. बंद पुकारल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मार्ड संघटनेचे सर्व डॉक्टर आक्रमक झाले आहेत.






