लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन थाळी बंद होणार? अनुदान न मिळाल्याने अनेक केंद्रं बंद होण्याची शक्यता!

Written by:Rohit Shinde
Published:
काही महिन्यांचे अनुदान संपल्याने शिवभोजन थाळी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनेक केंद्रांना शासनाचे अनुदानच न मिळाल्याने ही केंद्रे बंद पडताना दिसत आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन थाळी बंद होणार? अनुदान न मिळाल्याने अनेक केंद्रं बंद होण्याची शक्यता!

महाराष्ट्रातील शिवभोजन थाळी योजना ही गरीब व गरजूंना स्वस्त दरात पोषक अन्न मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने ही योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबवली आहे. या योजनेत कमी दरात पौष्टिक आणि तृप्त करणारे जेवण दिले जाते. शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा लाभ होतो. त्यामुळे भुकेल्या पोटाला अन्न मिळते आणि समाजात अन्नसुरक्षेला चालना मिळते. परंतू आता राज्यातील ही शिवभोजन थाळीची योजनाच अडचणीत सापडल्याची माहिती समोर येत आहे.

शिवभोजन थाळी बंद होणार?

गरिबांना, कामगारांना, विद्यार्थ्यांना आणि वयोवृद्धांना दिलासा देणारी ‘शिवभोजन थाळी योजना’ सध्या मोठ्या संकटात आहे. कारण, या थाळीसाठी केंद्रांना मिळणारे अनुदान तब्बल चार महिन्यांपासून थकले असल्याचं वृत्त समोर आलं आहे. शिवभोजन थाळी म्हणजे केवळ एक जेवणाची सोय नव्हे, तर अनेक कुटुंबांचा जगण्याचा आधार आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी मिळावा म्हणून, शिवभोजन थाळीसाठीचं अनुदान रोखलं गेलं आहे. म्हणजे एका योजनेला गती देताना दुसऱ्या योजनेची गळचेपी सुरू आहे. अशा स्वरूपाची चर्चा सध्या लोकांमध्ये सुरू असल्याचे चित्र आहे.

शिवभोजन थाळीचा अनेकांना आधार

शिवभोजन योजना थांबली, तर त्याचा फटका फक्त केंद्र चालकांना बसणार नाही तर ती गरिबांच्या पोटावरचा घाव ठरेल. महागाईच्या काळात ही योजना कित्येक गरीब कुटुंबांसाठी वरदान ठरली होती. आता तीच योजना धोक्यात आहे. शिवभोजन थाळी ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत उपयुक्त आणि लोकाभिमुख योजना आहे. या योजनेमुळे गरीब, मजूर, चालक, बांधकाम मजूर आणि बेघर यांसारख्या वर्गांना स्वस्त दरात पौष्टिक अन्न मिळते. कमी पैशांत पोटभर जेवण मिळाल्यामुळे त्यांचा दैनंदिन खर्च कमी होतो आणि भूक भागते. समाजातील सर्वात दुर्बल घटकांना या योजनेमुळे आधार मिळतो.

शिवभोजन थाळी ही केवळ जेवण पुरवणारी योजना नसून गरिबांच्या सन्मानाचे प्रतीक आहे. यातून सामाजिक समता, अन्नसुरक्षा आणि कल्याणकारी शासनाची भावना दिसते. त्यामुळे शिवभोजन थाळीचे गरीबांसाठीचे महत्व अनन्यसाधारण आहे. अशा परिस्थितीत ही योजना बंद झाल्यास अनेकांची चिंता वाढणार आहे.