Marathi News

राज्यात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हं; पुढील 4 दिवसांचा हवामान विभागाचा पावसाचा अंदाज काय?

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात आता थंडावलेला मान्सूनचा पाऊस हळू हळू सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. हवामान विभागाचा पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज समोर आला आहे, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ...
राज्यात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हं; पुढील 4 दिवसांचा हवामान विभागाचा पावसाचा अंदाज काय?

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. पण मान्सूनची वाटचाल लक्षात घेता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने चांगलीच उसंत घेतल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं होतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील रखडल्या होत्या….त्यामुळे आता दोन दिवसांत मान्सून सक्रिय झाल्यास सर्व कामांना गती मिळू शकते.

कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कसा असेल?

कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यात आहे. ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोलापूर आणि सांगली मध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोलापूरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा-विदर्भातील पावसाचा अंदाज काय?

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला पण तो फार कमी वेळ पडला. परंतु आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना 11 जूनसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर जास्त राहील. अमरावती आणि नागपूरमध्येही पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगरमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

मान्सून सक्रिय होण्याची चिन्हं

येत्या काही दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे 12 ते 16 जून या कालावधीत देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा भाग आणि गोव्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews