Soyabean Price: राज्यात सोयाबीनच्या दरात उलथापालथ; वाशिममध्ये मिळाला ७ ते ८ हजारांचा दर

Written by:Rohit Shinde
Published:
वाशिममधून एक मोठी बातमी खरंतर समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी सोयाबीन बाजारात ऐतिहासिक तेजी अनुभवायला मिळाली.
Soyabean Price: राज्यात सोयाबीनच्या दरात उलथापालथ; वाशिममध्ये मिळाला ७ ते ८ हजारांचा दर

आता राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा होताना दिसत आहे. या महिन्यात सध्याच्या दरांमध्ये साधारण वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशा परिस्थितीत वाशिममधून एक मोठी बातमी खरंतर समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी ७ नोव्हेंबर रोजी सोयाबीन बाजारात ऐतिहासिक तेजी अनुभवायला मिळाली.

वाशिममध्ये प्रतिक्विंटल ७ ते ८ हजारांचा दर

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सोयाबीन बाजारात ऐतिहासिक तेजी अनुभवायला मिळाली. विशेषतः ‘बिजवाई सोयाबीन’ या उच्च प्रतीच्या जातीने दराच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. या सोयाबीनला प्रतिक्विंटल तब्बल ८ हजार ४३० रुपयांचा उच्चांक मिळाल्याची नोंद झाली असून, व्यापाऱ्यांमध्ये चढाओढीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ एका दिवसात १,००० रुपयांची उसळी सोयाबीन दरात पाहायला मिळाली. ६ नोव्हेंबर रोजी बिजवाई सोयाबीनचा दर ७ हजार ४०१ रुपये प्रति क्विंटल इतका होता, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ७ नोव्हेंबरला तो वाढून थेट ८ हजार ४३० रुपयांवर पोहचला. सलग दोन दिवस बाजारात झालेल्या या वेगवान वाढीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

त्यामुळे एकूणच राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये आगामी काही दिवसांत सोयाबीनच्या दरात चांगलीच तेजी निर्माण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उच्च दरामुळे बाजार समिती परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक शेतकरी आपल्या उत्पादनाला मिळालेल्या दरामुळे आनंदी दिसले. वाशिमसह आसपासच्या तालुक्यांतील शेतकऱ्यांनीही आपला माल विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे.

१५ नोव्हेंबरपासून शासकीय खरेदी

केंद्र सरकारने १८ लाख ५० हजार टन सोयाबीन, ३ लाख ३० हजार टन मूग, आणि ३२ लाख ५६ हजार क्विंटल उडीद खरेदीसाठी मान्यता दिली आहे. रावल म्हणाले, “मागील वर्षी ११ लाख २१ हजार टन सोयाबीन खरेदी झाली होती. यंदा उत्पादन सुमारे ७५ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्राकडे २० लाख टन खरेदीचा प्रस्ताव दिला होता, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८.५ लाख टन खरेदीस मान्यता मिळाली आहे. आवश्यकता भासल्यास उर्वरित खरेदीलाही मंजुरी मिळेल.

रावल पुढे म्हणाले की, “मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात सोयाबीनखालील क्षेत्र मोठे आहे आणि येथे उत्पादित होणाऱ्या सोयाबीनला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भावांतर योजनेची आवश्यकता नाही. उलट, येथे उच्चांकी खरेदी होईल.” मागील वर्षी राज्यात ५६५ खरेदी केंद्रे कार्यरत होती. यंदा ही संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. सर्व खरेदी प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संस्था थेट सहभागी होऊ शकतील. त्यामुळे आगामी काही दिवसांत सोयाबीन उत्पादकांना आणखी अच्छे दिन येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.