Soyabean Price: सोयाबीनच्या दराने गाठला 8 हजारांचा टप्पा; दरवाढीमुळे शेतकरी आनंदले, दरवाढीचं कारण ?

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनने आता 8 हजारांचा टप्पा गाठला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे.
Soyabean Price: सोयाबीनच्या दराने गाठला 8 हजारांचा टप्पा; दरवाढीमुळे शेतकरी आनंदले, दरवाढीचं कारण ?

देशभरात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे बियाणे दर्जाच्या सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी बियाण्याच्या सोयाबीनला बाजारात प्रचंड मागणी असून, दरही झपाट्याने वाढले आहेत. साधारण सोयाबीनचा भाव जिथे हमीभावापेक्षा हजार रुपयांनी कमी आहे, तिथे बियाणे दर्जाच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजारांपासून ते तब्बल ८ हजार रुपये इतका दर मिळत आहे. बियाणे कंपन्यांकडून आक्रमक खरेदी सुरू असून, व्यापाऱ्यांच्या मते, या मागणीचा फायदा काही शेतकऱ्यांना मिळत आहे.

बियाण्याचा दर्जा असेल तर 8 हजार दर

बियाणे कंपन्यांना पुढील हंगामासाठी उत्तम प्रतीचे सोयाबीन बियाणे तयार करायचे असल्याने त्या सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे बियाणे दर्जाच्या सोयाबीनला “प्रीमियम रेट” मिळत आहे. बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ७,५०० ते ८,००० रुपये दर मिळत आहे, तर सामान्य दर्जाच्या सोयाबीनचा सरासरी भाव ४,२०० ते ४,५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

१५ नोव्हेंबरपासून शासकीय खरेदी

केंद्र सरकारने १८ लाख ५० हजार टन सोयाबीन, ३ लाख ३० हजार टन मूग, आणि ३२ लाख ५६ हजार क्विंटल उडीद खरेदीसाठी मान्यता दिली आहे. रावल म्हणाले, “मागील वर्षी ११ लाख २१ हजार टन सोयाबीन खरेदी झाली होती. यंदा उत्पादन सुमारे ७५ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्राकडे २० लाख टन खरेदीचा प्रस्ताव दिला होता, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८.५ लाख टन खरेदीस मान्यता मिळाली आहे. आवश्यकता भासल्यास उर्वरित खरेदीलाही मंजुरी मिळेल.

सोयाबीन उत्पादकांना दिलासा

मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात सोयाबीनखालील क्षेत्र मोठे आहे आणि येथे उत्पादित होणाऱ्या सोयाबीनला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भावांतर योजनेची आवश्यकता नाही. उलट, येथे उच्चांकी खरेदी होईल. मागील वर्षी राज्यात ५६५ खरेदी केंद्रे कार्यरत होती. यंदा ही संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. सर्व खरेदी प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संस्था थेट सहभागी होऊ शकतील. त्यमुळे एकूणच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आगामी काही दिवसांत चांगला दिलासा मिळणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews